घरोघरचा चातुर्मास

चातुर्मासासाठी घरातील गृहिणी वेगवेगळे नेम करत. सातत्याने, न विसरता एखादी चांगली आणि कल्याणकारक गोष्ट करणे हा निश्चय गृहिणी करत व पाळत.पण तो संस्कार न सांगताही सगळ्या घरावर होत असे. दूध, तूप, डाळ,. भात अशांसारखे पदार्थ वर्ज्य करुन स्वत:च्या आहारावर बंधन घातले जाई. पण बव्हंशी नेम हे दानसंकल्पनेतूनच होत. रोज एका गरीब सवाष्णीची ओटी भरणे. एखाद्या गरिबाच्या तान्हुल्यासाठे दूध देणे, रोज एकाला जेवण देणे, एअका डब्यात रोज मूठभर धान्य ठेवणे व मग ते सत्पात्री दान करणे वगैरे. एखाद्या मंदिरात रोज साय़ंकाळी दिवा लावणे. एखाद्या धर्मग्रंथाचे वाचन सामूहिकरीत्या करणे, असेही नेम असत. नेम कोणताही केलेला असो, त्याचे उद्यापन मात्र दानानेच केले जाई. एकप्रकारे हे आत्मसंयमन व मनोबल तसेच त्यागभावना वाढविण्यासाठी केलेले तप असे.

आज या नेमांचे वा दानाचे प्रकार कालामानानुसार बदलले आहेत. ‘सावित्रीबाई फुले दत्तक योजने‘ तर्फे एखाद्या मुलीचा शिक्षणखर्च देणे, ‘वनवासी छात्रावासा‘ला दरमहा काही रक्कम देणे. अनाथ, अपंगाच्या संस्थेला अर्थसाहाय्य करणे, याचबरोबर काही वसतिग्रुहांतल्या मुलांचा अभ्यास घेणे, वाचनासाठी पुस्तके देणे, गणवेश देणे, विज्ञान साहित्या पुरविणे, खेळाचे साहित्य देणे, गरीब महिलेला साडीचोळी देणे, अंथरुण पांघरुण देणे इत्यादी नेम आज उचित ठरतात. पण मुळातील संकल्पना मात्र तीच आहे, समाजऋण फेडणे. अन्नदान आणि वस्त्रदानाबरोबरच आज नेत्रदान, देहदानही केले जाते. सामाजिक कार्यकर्ते समयदान करत असतात, तर काही जण संपूर्ण आयुष्य विशिष्ट कामासाठे अर्पण करतात. अन हा दानसंस्कार चिरस्थायी बनतो. सर्वव्यापी होतो. सत्प्रव्रुत्त घरांतूनच तो विकसित झालेला असतो. स्वार्थ आणि परमार्थ उपेक्षून सर्वस्वी स्वार्थातच रमणारांचे गणना कृतघ्नांतच करावी लागते.