घुबड आणि टोळ

एक म्हातारा घुबड झाडाच्या ढोलीत झोप घेत असता, एका टोळाने त्या झाडाखाली गायन आरंभिले. गायन बंद करण्याविषयीं घुबडाने त्या टोळास विनंति केली की, ‘बाबा, तू येथून जा; मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकिरीने माझी झोप मोडते.’ यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्यास शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, ‘तू लुच्च चोर आहेस; रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस आणि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.’ घुबडाने त्यास सांगितले, ‘गृहस्था, तू आपले तोंड संभाळ, नाहीं तर मग पस्तावशील.’ तरी तो टोळ ऐकेना. घुबडाची आणखी निंदा करून त्याने पुनः गायनास आरंभ केला. मग घुबडाने त्याची खोटीचे स्तुति चालविली. तो म्हणाला, ‘बाबा, क्षमा कर. तुझे गायन इतके सुंदर आणि गोड आहे, हे इतका वेळ माझ्या लक्षांत आले नव्हते. परंतु आता मला कळून आले की, तुझ्यासारखा गाणारा तूच, गंधर्वाच्यानेंही तुझी बरोबरी करवणार नाही. तुझ्या मधुर स्वरापुढे सारंगी काहीच नाही, तुझे गाणे ऐकून कोकिळही लाजेल. बरी आठवण झाली, मजजवळ एक अमृताची कुपी आहे, त्यांतले एक चमचाभर अमृत मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्यामुळे तुझा गळा अगदी सुकून गेला असेल, असे मला वाटते.’ टोळास खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याजपाशी गेला, तोंच घुबडाने त्यास उचलून आपल्या तोंडात टाकिले !

तात्पर्य:- आपणास जी गोष्ट आवडते, ती सर्वांसच आवडले, असा नियम नाही, ही गोष्ट लक्षांत न घेता, दुसऱ्याच्या आवडीनिवडींविषयी जे बेपर्वाई दाखवितात, ते शेवटी आपला नाश करून घेतात.