गोड पॅनकेक

साहित्य :

  • १ वाटी तांदळाचे पीठ
  • अर्धी वाटी बारीक चाळणीने चाळलेली कणिक
  • १ चिमूट मीठ
  • अडीच वाट्या पाणी

सारणासाठी :

  • दीड वाटी ओले खोबरे
  • दीड वाटी बारीक चिरलेला गूळ
  • १ चमचा भाजलेली खसखस
  • २ वेलदोडे (पूड)
  • ४-५ काजूचे तुकडे (ऐच्छिक)
  • अर्धी वाटी तूप

कृती :

गोड पॅनकेक

गोड पॅनकेक

तांदळाचे पीठ, कणिक, मीठ व पाणी एकत्र कालवून सरबरीत मिश्रण करावे. गुठळी राहू देऊ नये. झाकून दोन तास बाजूला ठेवावे. नारळात गूळ मिसळून मंद विस्तवावर ठेवावे. गूळ विरघळवून मिश्रण चिकटसर होऊन घट्ट होऊ लागले की खसखस, काजू तुकडे घालून ढवळावे व खाली उतरवावे.

निवाल्यानंतर वेलचीपूड घालावी. तवा किंवा फ्राईंग पॅनमध्ये नारळाच्या शेंडीने किंचित तूप लावावे. व डावभर पीठ ओतून डावानेच गोल सारवावे. साधारण तळहाताएवढा आकार होईल. खालच्या बाजूने बदामीसर झाले की उलटावे. कडेने थोडे तूप सोडावे. दोन्ही बाजू चांगल्या भाजाव्यात पण सोनेरी बदामीइतपतच असावा. धिरडे शिजले की ताटलीत काढावे त्यावर २ चमचे सारण मध्यभागी पसरावे व छोटी गुंडाळी करून प्लेटमध्ये ठेवावी. खायला देतेवेळी बरोबर लिंबाची कापटी व आवडीनुसार मध किंवा काकडी (सॉससारखी) वरून घालावी व द्यावे.

परदेशी पॅनकेकचे हे देशी रूप मुलांना व मोठ्यांनाही आवडेल. शिवाय हा पदार्थ पोटभरीचा व पौष्टिक आहे. गोडाचे सारण नको वाटल्यास उसळी किंवा कमी तिखट चटणी, बटाटाभाजी असेही मिश्रण वापरता येते.