सचिनच्या आईला देण्यात आलेलं सोन्याचं स्मृतिचिन्ह चोरले

सचिनच्या आईला देण्यात आलेलं सोन्याचं स्मृतिचिन्ह चोरले

सचिनच्या आईला देण्यात आलेलं सोन्याचं स्मृतिचिन्ह चोरले

मैदानात स्पिन असो अथवा फास्ट कोणत्याही बॉलला सीमापार करणारा क्रिकेटच्या मैदानातील राजा सचिन तेंडुलकर याला मैदानाबाहेरचा ‘ गुगली’ मात्र कळलाच नाही. रमेश तेंडुलकर यांच्या कवितांच्या सीडीचं अनावरण गेल्या शनिवारी मुंबईत झालं, त्यावेळी सचिनच्या आईला देण्यात आलेलं ८० ग्रॅम सोन्याचं स्मृतिचिन्ह चोरीला गेले आहे. बांद्रा पोलीस या संदर्भात तपास करत असून अद्याप पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही.

आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत सचिनने शनिवारी रंगशारदा येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या गाण्यांच्या सीडीचे अनावरण केले. त्यावेळी सचिनचा भाऊ नितीन याच्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची आठवण कायम राहावी म्हणून आयोजकांकडून तेंडुलकर परिवाराला ८० ग्रॅम सोन्याचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून देण्यात आले. त्यावेळी सचिनची आई प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित नव्हती. तिच्या वतीने सचिनचा भाऊ नितीन याने स्मृतिचिन्ह स्वीकारले आणि जवळच ठेवून दिले. पण कार्यक्रम संपला तेव्हा हे स्मृतिचिन्ह त्या जागी नव्हतं. आयोजकांनी आणि सर्वच उपस्थितांनी रंगशारदाची कसून तपासणी केल्यानंतरही ते सापडलं नाही, त्यामुळे या प्रकरणी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

पोलीस या चोरीचा तपास करत असून लवकरच चोर पकडला जाईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. परंतु, सीसीटीव्हीची मदत घेऊनही पोलिसांच्या हाती काहीही माहिती लागलेली नाही.

८० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या स्मृतिचिन्हाची किंमत दोन लाख रुपये होती, पण त्याहीपेक्षा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या भावना अनमोल होत्या. सचिनच्या आईसाठी आठवणीतील एक अमूल्य ठेवा गेल्याचे दु:ख अधिक असल्याचे आयोजकांनी सांगितले.