सरकारनेच मंत्रालय बांधावे

शरद पवार, आर. आर. पाटील आणि छगन भुजबळ

शरद पवार, आर. आर. पाटील आणि छगन भुजबळ

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाला सल्ला दिला की, ‘मंत्रालयातील अग्निप्रलय हे महाराष्ट्रावरचे संकट आहे. त्यावर मात करुन असे मंत्रालय उभारा की देशाला आदर्श वाटेल. त्यासाठी एक हजार कोटी रुपये जरी खर्च करावे लागले तरी चालेल. पण राज्य सरकारने आता तरी कायमस्वरुपी सक्षम मंत्रालय उभारण्याचा निर्णय घ्यावा. ‘सरकारनेच हे बांधकाम करावे. बीओटी तत्त्वावर ते खासगी कंपनीला देऊ नये.

दुपारी साडेबाराच्या सुमारास मंत्रालयाच्या पाहणीसाठी ते मुंबईला गेले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांसोबत त्यांनी विधान भवनात चर्चा केली. त्यांनी मंत्रालयाची पाहणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत केली. ‘राज्य सरकार या संकटावर राज्य सरकार नक्कीच मात करेल,’ असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी मंत्र्यांना दिलासा दिला.

पवार यांनी सांगितले की ‘मंत्रालयाच्या इमारतीचा आकार ४ लाख २३ हजार चौरस फूट आहे. महाराष्ट्राचा कार्भार पाहता मंत्रालयाची इमारत प्रशस्त व अत्यंत सुरक्षित असण्याची दक्षता काटेकोरपणे घ्यायला हवी.’ ‘ही आग राज्यावरची आपत्ती जरी ठरली असली, तरी ही इष्टापत्ती समजून पुन्हा कामाला लागा. अशी दक्षता घ्या की पुढील १०० वर्षे मंत्रालयाची वास्तू देशासाठी आदर्श ठरेल,’ अशी सूचना पवार यांनी मंत्र्यांना केली.

त्यांनी सांगितले की वरळीच्या दूध डेअरीकडे मंत्रालयाची नविन वास्तू उभारण्यासाठी १७ एकर जागा उपलब्ध आहे. त्यांनी सूचना केली की २० लाख चौरस फुटांचे बांधकाम जागेवरच करावे. कार्यालय सरकारचे असल्यामुळे सरकारनेच त्याचे बांधकाम करायला हवे. मुंबईसह देशात अनेक वास्तुरचनाकार आहेत. त्यांचा सल्ला घ्यावा. ते असेही म्हणाले की, खासगी कंपनीला आराखडा तयार करून बांधकामाचे कंत्राट दिले, तरी सरकारनेच या कामावर नियंत्रण आणि खर्च करावा.

मंत्रालयाची वास्तू धोकादायक
पवार यांनी इशारा दिला की, मंत्रालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे मंत्रालयाची वास्तू धोकादायक आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तज्ञांशी चर्चा केली. तज्ञांनी सांगितले की, मंत्रालयाची इमारत ५० वर्षे जुनी आहे व ती ५ ते ६ तास आगीत राहिल्यामुळे तिचा मूळ ढाचा धोकादायक होतो. त्यांनी असेही स्पष्ट केले की, मंत्रालयाच्या इमारतीची संपूर्ण तपासणी होणे खूप गरजेचे आहे.

तात्पूर्ती उपाययोजना
श्री. पवार यांनी बैठकीत दोन पर्याय मंत्र्यांपुढे मांडले. मंत्रालयाचा कारभार ठप्प झालेला आहे व ४८ तासांत ते सुरु करण्यासाठी तात्पूर्ती उपाययोजना करा. त्यानंतर दूरदृष्ट्री ठेऊन कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून मंत्रालयाच्या नवीन वास्तूची उभारणी करा, असे त्यांनी सांगितले. पवार यांनी सूचना केली की, मुंबईतल्या विविध सरकारी कार्यालयांतल्या पर्यायी जागांची आणि वास्तूंची निवड मंत्रालयाचा कारभार तातडीने सुरु करण्यासाठी करावी.