गृहिणी

घरातील गृहिणी हा तर घरांचा केंद्रबिंदूच आहे. ‘ गृहिणी गृहमुच्यते ’ असे म्हटले गेले आहे. राष्ट्र सेविका समितीच्या वंदनीय लक्ष्मीबाई केळकर ( मावशी ) म्हणत असत, “ स्त्री ही समाजरथाची सारथी आहे. ” व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येकाचा स्वभावविशेष लक्षात घेऊन, प्रत्येकातील गुण वाढीस लागतील व दोष कमी होतील याकडे लक्ष देत, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत, परस्परांत संघर्ष तर होणार नाहीच पण त्यांचे स्वभाव एकमेकांस पूरक ठरतील अशी दक्षता घेत, प्रत्येकाला त्याच्यावरील जबाबदारीची जाणीव देत, आपापले कर्तव्य करण्यासाठी मार्गदर्शन करीत गृहिणी घराचा एकजिनसीपणा राखत असते.

गृह म्हणजे ग्रहण करणे. अर्थातच सर्वसमावेशकता असणे. प्रसन्नवदना गृहिणीमुळे घरातील सर्वानाच एक आधार , एक दिलासा, एक आश्वासकता प्राप्त होत असते. कम्युन्सचा प्रयोग रशियात केला गेला. ’घर-कुटुंब’ नाहीसे झाले . त्याचे दुष्परिणाम दिसू लागले अन कुटुंबसंस्थेच्या पुनर्वसनाचाही एक विचार तेथे पुढे आला.

या सगळ्यांत गृहिणीला उपयोगी पडत असतो तिचा नैसर्गिक मातृत्वभाव. सगळ्यांचे पालन करत असतानाच कुटुंबाला सुसंस्कारित करण्याचे कार्य ती सहजपणे करते. श्यामची आई श्यामला म्हणते, “पायाला शेण लागू नये म्हणून जपतोस तसेच मनालाही घाण लागणार नाही याची काळजी घे.” अन म्हणूनच आमच्या संस्कृतीने मातेला श्रेष्ठ मानले आहे. तिला नेहमीच आदराचे स्थान दिले आहे. ’मातृदेवो भव’ आधी, मग पितृदेवो भव, मग आचार्य देवो भव! कितीतरी थोरथोरांनी आपल्या अलौकिक गुणवत्तेचे श्रेय मातृचरणी समर्पण केले आहे.