गुलाबाचे चिरोटे

साहित्य :

 • ३ वाट्या मैदा
 • अर्धा चमचा मीठ
 • अर्धा चमचा बेकींग पावडर
 • पाव वाटी पातळ तूप
 • थोडा लाल रंग.

साठा :

 • २ टेबल चमचा कॉर्नफ्लोअर
 • अर्धी वाटी डालडा.
 • कृती :

  मैदा, मीठ, बेकींग पावडर व तुपाचे मोहन एकत्र करावे. त्यात थोडा लाल रंग घालून दुधाने पीठ भिजवून ठेवावे. तूप फेसून त्यात कॉर्नफ्लोअर घालून साठा तयार करावा. वरील पिठाच्या ९ पोळ्या लाटून घ्या. पिठी वापरून पातळ लाटा. एका पोळीवर साठा पसरून त्याची गुंडाळी करा. दुसऱ्या पोळीवर साठा पसरा. त्याच्या कडेला पहिली गुंडाळी ठेवून दुसऱ्या पोळीची गुंडाळी करा. तिसरी पोळी पसरून त्यावर साठा लावा. पहिली गुंडाळी त्यावर ठेवून पुन्हा गुंडाळी करा. अशा ९ पोळ्यांच्या ३ गुंडाळ्या करून ठेवा. नंतर ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा. नंतर त्याचे तुकडे कापून घ्या. कापलेली बाजू वर करून अलगद हाताने थोड्या पिठीवर चिरोटा लाटा.

  नंतर कढईत तूप तपले की, त्यात एकेक चिरोटा घाला. कढईत टाकल्याबरोबर जरा खाली दाबा. विणायच्या सुईने पाकळ्या उलगडा व तुप उडवून तळा. तळल्यावर अगदी गुलाबाच्या फुलासारखा दिसतो. सर्व चिरोटे तळून झाले की, थोड्या साखरेचा पक्का पाक करून घ्यावा व प्रत्येक चिरोट्यावर थोडा थोडा घालावा व शोभेसाठी त्यावर बदाम-पिस्त्याचे काप टाकावे. पाक गरम असतानाच टाकावे म्हणजे चिरोट्यावर काप चिकटतील.