गुरुजी बोलले सर्वजण लाजले

सरदार सुभानसिंग यांच्याकडे एकदा सदिच्छ मेजवानी होती. गावातल्या सर्व बड्या बड्या वेचक आसामींना आमंत्रिलं गेलं होतं. त्या सर्वात गरिब गॄहस्थ एकटे गुणे गुरुजी हेच होते. त्यांना आमंत्रण जाण्याच एकच कारण आणि ते म्हणजे, ते सुभानसिंगाचा धाकटा मुलगा बेभानसिंग याला शिकवण्याचा प्रयत्न करायला त्यांच्या घरी आठवड्यातून चार वेळा जात होते.

सरदारसाहेबांकडल्या मेजवाणीचं आमंत्रण म्हणून सर्व निमंत्रित मंडळी सुंदर उंची कपडे घालून आली होती. स्वच्छ पण एकदम साधा पोषाख फ़क्त गुणे गुरुजींचाच होता. त्यामुळे तिथे जमलेली बडी मंडळी त्यांच्या कपड्यांची टिंगलटवाळी करीत होती.

कुणी त्यांना बोचकारीत होतं, ‘काय गुरुजी ? खापरपणजोबांचे कपडे घालून आलात का?’ तर कुणी त्यांना विचारीत होतं, ‘गुरुजी ! मोहेंजोदाडो इथल्या उत्खननात सापडलेले कपडे तुम्हाला कुठे हो मिळाले? कुणी काय, कुणी काय, पण असंच तिरक्या वळणाचं बोलत होते; इतर त्यांना हसून दाद देत होते; पण गुणे गुरुजी ते सर्व निमूटपणे ऎकून घेत होते.

मेजवानी संपता संपता अनेक दुढ्ढाचार्यांनी सरदारांचे अभिष्टचिंतन करणारी रटाळ भाषणे ठोकली. शेवटी गुरुजी उभे राहिले. राहिले कसले? इतरांने केलेलय खोट्या आग्रहाची संधी साधून ते खरोखरच उभे राहिले. त्यांनी यजमानांना आयुष्य, वैभव व आरोग्य चिंतणारं अतिशय ह्रदयस्पर्शी भाषण सुरु केलं. त्यांच भाषणा सर्वजण असहायपणे तन्मय होऊन ऎकू लागले.

भाषण संपवता संपवता ते म्हणाले,’ अत्यंत उंची कपड्यात वावरणाऱ्या या लोकांबरोबर यजमानांनी माझ्यासारख्या सामान्य कपड्यातील शिक्षकालाही मेजवानीला बोलावलं, म्हणून मी त्यांचा आभारी आहे. वास्तविक सरदारसाहेबांकडे मेजवाणीला यायचं म्हणजे उंची कपड्यातच आलं पाहिजे, हे मला कळत होतं; आणि त्या दृष्टीनं मी आज सकाळी प्रयत्नही केला. पण भाड्याने कपडे देणाऱ्या दुकानदारानं मला सांगितलं, ‘तुम्हाला यायला उशीर झाला. सरदार सुभानसिंग यांच्याकडे आज होणाऱ्या मेजवानीचं आमंत्रण असलेल्या सर्वांनी कालच माझ्या दुकानातून सगळे उंची सदरे, शेरवान्या, सुट वगैरे भाड्याने नेले असल्याने, मी तुम्हाला चांगल्यापैकी कुठलाच पोषाख देऊ शकत नाही.’ दुकानदारानं असं सांगितल्यामुळे माझा नाइलाज झाला आणि मला सध्या पण स्वत:च्याच पोषाखात यावं लागलं.’

गुणे गुरुजींच्या या चातुर्यपूर्ण हल्ल्यानं सगळे टवाळखोर भुईसपाट झाले. स्वत: सरदार सुभानसिंग गुरुजींवर खूष होऊन पण त्याचबरोबर पाहुणा अजून गेले नसल्याचं भान ठेवून बेताचे हसले. परंतू त्यांचे चिरंजीव बेभानसिंग हे मात्र आपल्या गुरुजींच्या विजयाने बेभान होऊन शेवटला टवाळखोर तिथून जाईपर्यंत हसत राहिले !