हिशेब लिहायला भाकऱ्या

दरबारातील खर्चाचे हिशोब लिहिणाऱ्या अधिकाऱ्यानं हिशेबात अफ़रातफ़र करुन पैसे खाल्ले, म्हणून तुर्कस्थानच्या सुलतानानं त्याला बोलावून घेतलं.त्या अधिकाऱ्यानं आपला अपराध कबूल करताच, सुलतान त्याला म्हणाला, ‘वास्तविक या अपराधाबद्दल तुला फ़ाशीच द्यायला हवं, पण हा तुझा पहिलाच अपराध असल्यामुळंं, तु ज्या कागदावर खोटे हिशोब लिहिले आहेस तू या दरबारात एका बैठकीत खाऊन खलास करावे, अशी शिक्षा मी तुला फ़र्मावतो.’

फ़ाशी चुकावी, म्हणून त्या पैसेखाऊ अधिकाऱ्यानं दरबारात सर्वासमक्ष ते पाचपंचवीस कागद चावून चावून कसेबसे संपवले, त्यानंतर त्याने सुलतानाने त्याला ताबडतोब नोकरीवरुन काढून टाकले.
आता त्या अधिकाऱ्याच्या जागी कुठल्या नेकदार माणसाची नेमणूक करायची, या विचारात तो सुलतान पडला असता, चतूर नासिरुद्दीनवर जळणारा दरबारातील एक इसम मुद्दाम सुलतानाला म्हणाला, ‘खाविंद, ख्वाजा नासिरुद्दीन हे अतिशय बुध्दीवान आहेत. तेव्हा या रिकाम्या झालेल्या जोखमीच्या जागी आपण त्यांची नेमणूक करावी.’

सल्ला देणाऱ्याचा हा कावा सुलतानाच्या लक्षात आला नाही. त्याने चांगल्या हेतूने नासिरुद्दीनला दरबारात येण्याचे आमंत्रण पाठविले.दरबारात आल्यावर व सुलतानाच्या निमंत्रणाला उद्देश कळल्यावर नासिरुद्दीन म्हणाला, ‘खाविंद, प्रत्येकाची बुध्दी वेगवेगळ्या विषयात चालत असते. गवयाची बुध्दी गाण्यात चालते, तर लढवय्याची बुध्दी लढाईत चालते. अशा परिस्थितीत गवयाच्या हाती तलवार आणि तरवार बहाद्दराच्या हाती तंबोरी देण्यात काय अर्थ ? हिशेब लिहिण्यात गम्य नाही म्हणून त्या जागी आपण माझी नेमणूक करु नये.’ परंतू एवढे सांगूनही ‘प्रयत्न तर करा. नाहीच काम जमलं, तर आपण बघू,’ असं म्हणून, सुलतानानं नासिरुद्दीनची त्या जागेवर नेमणूक केली.

दुसऱ्या दिवशी त्या जागेवर रुजु होण्यासाठी जाताना नासिरुद्दीन याने आपल्या पाच-सहा रोट्या म्हणजे भाकऱ्या नेल्या आणि कचेरीतील आपल्या आसनावर बसताच कागदावर लिहायचे हिशेब त्याने त्या भाकऱ्यांवर लिहायला सुरुवात केली ! तो प्रकार एका सेवकानं पाहिला व सुलतानाकडे जाऊन त्याच्या कानी घातला.

सुलतान स्वत: नासिरुद्दीनच्या दफ़्तरात गेला व ते दृश्य पाहून थक्क झाला. पुढे होऊन त्यानं त्याला विचारलं, ‘ख्वाजासाहेब, हे हो काय? दरबारी खर्चाचे हिशेब कागदावर लिहायचं सोडून, तुम्ही रोटयांवर का लिहिता ?

आपल्या जागेवरुन उठून व सुलतानाला कुर्निसात करुन नासिरुद्दीन म्हणाला, ‘हुजूर, हिशेब लिहिण्याच कामं मला बिलकूल येत नसतानादेखील केवळ आपल्या आज्ञेचा मान राखण्यासाठी मी ते स्विकारलं आहे. अशा परिस्थितीत हे हिशेब जर मी कागदावर लिहिले, आणि जर का मजकडून त्यात चुका झाल्या, तर माझ्यावरही ते कागद एका बैठकीत खाऊन खलास करण्याचा प्रसंग येणार. तेव्हा हिशेब भाकऱ्यांवरच लिहिले की, त्यात जरी चुका झाल्या तरी शिक्षा म्हणून मला भाकऱ्याच खाव्या लागतील, अशा धोरणाने मी हे हिशेब भाकऱ्यांवर लिहित आहे. खाविंद, यात माझी काही कसूर नाही ना !’

ख्वाजा नासिरुद्दीन याचा हा युक्तीवाद ऎकून सुलतान ओशाळला आणि त्याने त्याला त्या हिशेबनिसाच्या पदातून ताबडतोब मुक्त केले.