हृदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्कार

पं. हृदयनाथ मंगेशकर

पं. हृदयनाथ मंगेशकर

‘अनिल मोहिले माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळण्याऐवजी, माझ्या नावाचा पुरस्कार त्यांना मिळाला असता तर मला अधिक आनंद झाला असता. आज त्यांच्या नावाचा पुरस्कार घेताना मला खूप दुःख होत आहे. अत्यंत जड अंतःकरणाने मी हा पुरस्कार स्वीकारत आहे,’ भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी असे भावोद्गार काढले.

दिवंगत संगीतकार अनिल मोहिले यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त ‘सुरांनी मोहिले’ या कार्यक्रमाचे आयोजन ‘संगीतकार अनिल मोहिले फाऊंडेशन’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ या दोन संस्थांनी रविवारी केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. जड अंतःकरणाने हा पुरस्कार स्वीकारल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्याला आजवर अनेक पुरस्कार मिळाले. त्यामागे पुरस्कार देणाऱ्यांचा आपलेपणा, रसिकांचे कौतुक आणि संगीत क्षेत्रात आपण काहीतरी केल्याची भावना असायची. पण आज हा पुरस्कार घेताना खूप अवघडल्यासारखे होत आहे, असे ते म्हणाले.