जागा छान निवडली

पहिल्या बाजीरावाचा वकील काही खास कामानिमित्त निजामाकडे गेला असता, त्याला निजामाच्या खास वाड्यातील एका दालनात मुक्काम करावा लागला.

या मुक्कामात हा वकील शौचालयात गेला असता, त्याला भिंतीवर बाजीराव पेशव्यांचे चित्र लावलेले दिसले. तो प्रकार पाहून वकील मनातून संतापला, परंतू बाहेर पडल्यानंतर त्याने आपला राग व्यक्त केला नाही.

शौचालयात पेशव्यांचे चित्र लावलेले पाहूनही आलेल्या वकीलान ते चित्र तिथून काढायला सांगितले नाही, किंवा त्याबद्दल रागही व्यक्त केला नाही, असं पाहून निजामाच्या वजीरानं त्याला मुद्दाम विचारलं, ‘राहण्याची व्यवस्था उत्तम झाली आहे ना ?’

‘अत्यंत उत्तम आहे’. वकीलानं उत्तर दिलं

‘संडास कसा काय वाटला आमचा?’ वजीरान लगेच मुख्य प्रश्न विचारलां.

पेशव्यांचा वकील हसत म्हणाला, ‘चांगलाच आहे, उलट संडासात बसलं असतानाही डोळ्यात भरेल असं पेशव्यांचे चित्र जे तुम्ही दर्शनी जागेत लावलयं त्याच मला तर भलतच कौतुक वाटलं.’

‘ते कसं काय ?’ वजीरानं आश्चर्यानं प्रश्न केला.

पेशव्यांचा वकील म्हणाला, ‘तुमच्यापैकी कुणीही त्या संडासात जावो, तिथे लावलेलं पेशव्याचं चित्र नुसत पाहूनही क्षणार्धात पोट साफ़ होत असेल.’

तासाभरानंतर पेशव्यांचा वकील त्या शौचालयात गेला आसता, तिथे त्याला काही ते चित्र दिसले नाही.