जंतरमंतरवरचा शोले आणि दिवार! पटकथा व दिग्दर्शन कोणाचे?

एका बाजूला न्यायालये देश चालवत आहेत तर दुसर्‍या बाजूला ‘एन.जी.ओ.’नी भ्रष्टाचाराविरोधी मेणबत्त्या पेटवून मोठाच प्रकाश पाडला. त्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात अण्णा हजारे व त्यांचे उपोषण उजळून निघाले. दिल्लीच्या जंतरमंतर रोडवर अचानक एक ‘शोले’ व ‘दिवार’ निर्माण झाला. अण्णा हजारे यांना अमिताभ बनविणारी पटकथा व दिग्दर्शन नक्की कोणाचे होते?

शरद पवार

शरद पवार

अण्णा हजारे यांच्यामुळे दिल्लीला चढलेला ताप आता उतरला आहे. अण्णांच्या उपोषणाच्या धक्क्यातून केंद्रातले ‘यूपीए’ सरकार सावरले असले तरी उपोषणाच्या काळातील ते ९६ तास म्हणजे राळेगणसिद्धीतील ७३ वर्षांच्या हजारे यांनी सरकारला लावलेला सुरुंगच होता. हे सुरुंग पेरणारे नक्की कोण होते? अण्णा हजारे यांच्या निमित्ताने सरकारला हतबल व पंतप्रधानांना लाचार करणार्‍या शक्ती त्यावेळी अदृश्य स्वरूपात दिल्लीतील जंतरमंतर रोडवर वावरत होत्या. या ९६ तासांपैकी किमान ४८ तास मी जंतरमंतरवर होतो. जंतरमंतरने आतापर्यंत अनेक जनआंदोलने पाहिली. हजारोंच्या संख्येने तेथे आंदोलनकारी आले. त्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखले. संसदेच्या अधिवेशन काळात नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा प्रचंड मोर्चा जंतरमंतरवर येऊन थडकला. महागाई व भ्रष्टाचाराविरुद्ध ही धडक होती. पोलिसी दंडुके व पाण्याचे फवारे मारून ही संतापलेली जनशक्ती सरकारने रोखली. त्यात अनेकजण घायाळ झाले, पण महाराष्ट्रातून दिल्लीस आलेल्या एका कृश शरीराच्या ७३ वर्षांच्या वृद्धाचे उपोषण व त्यातून निर्माण झालेले तुफान सरकारला रोखता आले नाही. सरकारने स्वत:च शस्त्र टाकले. कायद्याचे, घटनेचे राज्य गुडघे टेकून रांगत, लोळत जंतरमंतरवर येऊन पडले. हे सर्व ज्या लोकपाल विधेयकाच्या निमित्ताने घडले ते लोकपाल विधेयक म्हणजे काय, हे हजारे यांचा जयजयकार करणार्‍या जंतरमंतर रोडवरील कित्येकांना माहीत नव्हते.

शेवटचे टोक!
देशातील भ्रष्टाचाराने शेवटचे टोक गाठले आहे. भ्रष्टाचाराने अनागोंदी व अराजक निर्माण केले आहे. १२१ कोटी लोकसंख्येचा हा देश भ्रष्टाचाराच्या वाळवीने पुरता पोखरून गेला आहे. तो कोसळलेलाच आहे. फक्त देशाचा प्राण निघून गेला आहे हे जाहीर करणे एवढेच बाकी आहे. गेल्या पाच वर्षांत जे पाच प्रमुख घोटाळे झाले त्या लुटलेल्या रकमेतून नवा हिंदुस्थान निर्माण झाला असता. ५५ कोटीत पाकिस्तानची निर्मिती झाली. एका २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात देशाचे सवा लाख हजार कोटी स्वाहा झाले. कॉमनवेल्थ घोटाळ्यात तेवढीच रक्कम बुडाली. तामीळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत एका मतामागे ५,००० अधिक घरपोच टी.व्ही.ची ऑफर देणारे राजकीय पक्ष हा पैसा कोठून आणत आहेत, यावर मनमोहन सिंग काहीच बोलत नाहीत. या सर्वांचाच स्फोट अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या निमित्ताने झाला. सरकारचा हा पराभव आहे.

कुचकामी सरकार
हिंदुस्थानची संसद व लोकनियुक्त सरकार अण्णा हजारे यांनी कुचकामी ठरवले. त्याचे दूरगामी परिणाम देशाला भोगावे लागतील. आज एका बाजूला न्यायालये सत्तेत हस्तक्षेप करून जणू देश चालविणार्‍याच्या भूमिकेत आहेत आणि दुसर्‍या बाजूला अण्णा हजारे व त्यांचे ‘मंडळ’ त्यांच्या पद्धतीने देशावर नियंत्रण ठेवू इच्छितात. निवडणुका न लढविता सरकारात बसून कोणतीही जबाबदारी न घेता निर्माण झालेली ही सत्ताबाह्य केंद्रे आहेत. देशाची घटना व कायदा राज्यकर्त्यांनी बेदखल केलाच आहे, पण सत्ताबाह्य केंद्रांची अरेरावी वाढत राहिली तर देशात यादवीच निर्माण होईल. भ्रष्टाचाराची यादवी मोडायलाच हवी, पण त्यासाठी दुसर्‍या यादवीचा उपचार हा आजारापेक्षा भयंकर आहे. अण्णा हजारे ज्या लोकपाल विधेयकाचा आग्रह धरीत आहेत ते विधेयक भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक चांगले हत्यार ठरू शकेल व त्याचे स्वागत सगळ्यांनीच केले. पण हा भ्रष्टाचार फक्त आपणच मोडू शकतो या भूमिकेत जंतरमंतरवरच्या लढवय्यांनी जाऊ नये.

जंगी स्वागत
अण्णा हजारे महाराष्ट्रातून दिल्लीस उतरले व त्यांचे विमानतळावरच प्रचंड स्वागत झाले. ६०-७० गाड्या तिरंगे लावून तेथे होत्या व जनसमुदाय अण्णांच्या जयजयकाराच्या घोषणा देत होता. जे अण्णांना महाराष्ट्रात ओळखतात ते मान्य करतील हे सर्व ‘नियोजन’ अण्णा व त्यांचे सहकारी करू शकत नाहीत. अण्णांचा चेहरा वापरून काही ताकदवान लोकांनी सरकारची कोंडी केली. हा एक शिस्तबद्ध इव्हेण्ट बनवला व सर्व काही नियोजनबद्ध रीतीने शेवटपर्यंत सुरू होते. जणू काही एखादी ‘कॉर्पोरेट लॉबी’ व त्यांचे व्यवस्थापन या सगळ्यामागे राबत होते. ‘मीडिया’सुद्धा ठरल्याप्रमाणे काम करीत होता व जंतरमंतरवर येणारी गर्दीसुद्धा नियोजनबद्ध रीतीने येत होती. या सगळ्या शिस्तीचे कौतुक करावेच लागेल. ही शिस्त व नियोजन या आधीच्या अण्णांच्या आंदोलनात कधीच दिसले नाही. अण्णांच्या आंदोलनात ‘संघटने’चे बळ कधीच नव्हते. ते यावेळी दिसले. फक्त अमिताभच्या नावावर चित्रपट चालत नाही. संगीत, दिग्दर्शन व नेपथ्य त्याच तोडीचे असले तरच ‘शोले’ व दिवार’ निर्माण होतो. जंतरमंतरवर ‘शोले’, ‘दिवार’ झाला. कारण कुणीतरी रमेश सिप्पी व त्याची टीम त्यामागे काम करीत होती.

घातक अहंकार
अण्णा हजारे देशातला भ्रष्टाचार संपवू इच्छितात व त्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. भ्रष्टाचार नष्ट व्हावा असे आज कुणाला वाटत नाही? पण सर्वच राजकारणी व अधिकारी भ्रष्ट आहेत. हा अहंकार घातक आहे. अण्णांनी भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण केले, पण त्याआधी डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध न्यायालयात लढाई केली व सरकारचा पराभव केला. स्वामी यांच्यामुळेच ‘टू जी स्पेक्ट्रम’चा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार उघडा झाला व दूरसंचार खात्याचे मंत्री ए. राजा यांना तुरुंगाची हवा खावी लागली. या खात्याचे अनेक अधिकारी तुरुंगात आहेत. रतन टाटांपासून, अंबानींपर्यंत अनेक उद्योगपतींना चौकशीच्या फैरीना सामोरे जावे लागले. मुख्य दक्षता आयुक्त थॉमस यांची नियुक्ती सरकारला रद्द करावी लागली व सरकारला झुकावे लागले. स्पेक्ट्रम घोटाळ्यात ज्यांनी सरकारला हजारो कोटींना लुटले ते शाहीद बलवासारखे लोक आज तुरुंगाची हवा खात आहेत व हीसुद्धा भ्रष्टाचाराविरोधातली जिंकलेली लढाई आहे. हजारे यांच्या आधी स्वामींनी हे रणशिंग फुंकले व ते एखाद्या शिलेदारासारखे लढत राहिले. ते स्वामी जंतरमंतर रोडवर फिरकले नाहीत. कारण भ्रष्टाचारविरोधी स्वामींची लढाई ही कायद्याच्या चौकटीत सुरू आहे व स्वामी यांच्या समर्थनासाठी कुणी मेणबत्ती मोर्चे काढले नाहीत.

पवारांचा राजीनामा
अण्णा हजारे महाराष्ट्रातून दिल्लीत आले व त्यांनी जंतरमंतरवर जाताच मराठी माणसांच्या दुर्गुणांचे प्रदर्शन केले. शरद पवारांवर दिल्लीत जाऊन हल्ला करण्याचे काहीच कारण नव्हते व लोकपाल विधेयकाबाबत मंत्रीगटातून पवारांनी बाहेर पडावे अशी मागणी हजारे यांनी केली. त्यावर कोणतीही खळबळ न करता पवार राजीनामा देऊन निघून गेले. दिल्लीचे वातावरण तेव्हा असे होते की, सरकारची झोप उडाली होती व हजारे यांच्याशी वाद घालण्याच्या मन:स्थितीत तेव्हा कोणी नव्हते. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यावर अण्णांचे बळ वाढले हे पहिले व अण्णा सांगतात म्हणून राजीनामा देऊ नका असे तेव्हा पंतप्रधानांनी पवारांना सांगायला हवे होते, ते सांगितले नाही. जो तो आपलीच कातडी वाचवायच्या प्रयत्नात तेव्हा होता हे दुसरे. पण अण्णांचा दुटप्पीपणा असा की, पवारांच्या राजीनाम्यानंतर ते सरकारची मजा पाहात राहिले. जणू देशाच्या मंत्रिमंडळात पवार हेच एकमेव भ्रष्ट मंत्री आहेत व मनमोहन सिंगांपासून सगळे प्रभू श्रीराम आहेत. ज्या मंत्रीगटातून पवार बाहेर पडले त्या मंत्रीगटात वीरप्पा मोईली व चिदंबरम हे दोन मंत्री आहेत व त्यांच्यावरही पवारांइतकेच गंभीर आरोप आहेत. हजारे यांनी त्यांचे राजीनामे मागितले नाहीत. ज्या कपिल सिब्बल यांच्याशी अण्णा गटाचे लोक तडजोडीचा मसुदा ठरवीत होते, त्यांनी ‘टू जी स्पेक्ट्रम’च्या व्यवहाराचे खुले समर्थन केले होते. राजा यांना ज्या घोटाळ्यासाठी तुरुंगात जावे लागले तो घोटाळा झालाच नसल्याची वकिली हेच सिब्बल शेवटपर्यंत करीत होते व इतका मोठा घोटाळा व भ्रष्टाचार ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली घडला ते मनमोहन सिंग चांगले गृहस्थ असल्याचे प्रमाणपत्र अण्णांनी देऊन टाकले. जंतरमंतरवर बसून अण्णांनी पहिला राजीनामा पंतप्रधान मनमोहन सिंगांचा व दुसरा राजीनामा ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधींचा मागायला हवा होता. भ्रष्टाचाराला या दोघांनी पाठीशी घातले आहे व स्पेक्ट्रम घोटाळ्याचा पैसा सोनिया गांधींच्या इटालीतील बहिणींपर्यंत पोहोचल्याचा पुरावा डॉ. स्वामी यांनी सादर केला आहे, पण अण्णांचे मनमोहन सिंगांविषयी मत चांगले आहे व सोनिया गांधी यांच्याविषयी गैरसमज दूर झाले आहेत. ज्यांनी गुडघे टेकले ते भ्रष्ट असले तरी चांगले व ज्यांनी गुडघे टेकले नाहीत ते भ्रष्ट व देशाचे दुश्मन अशी नवी व्याख्या जंतरमंतरला ठरली काय? स्वामी अग्निवेश हे अण्णा हजारे यांचे नवे साथीदार आहेत. हरयाणातील वीटभट्टी मालकांकडून त्यांनी कसे पैसे उकळले व हा सर्व व्यवसाय कसा मोडायचा प्रयत्न केला त्याचे किस्से एकदा अण्णांनी समजून घ्यायला हवेत. हे सर्व लोक आता अण्णांच्या सहीने देशाच्या राजकारण्यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देणार ही लोकशाहीची व गांधी विचारांची विटंबनाच म्हणायला हवी.

तिरस्कार कशासाठी?
जनलोकपाल विधेयक मंजूर झाले तर भ्रष्टाचारास नक्कीच आळा बसेल, पण त्यासाठी देशातील सर्व राजकारणी व राजकीय पक्षांबद्दल घृणा निर्माण करणे कितपत योग्य आहे? महात्मा गांधी किंवा आचार्य विनोबांनी हे कधीच केले नाही. सर्व राजकारणी भ्रष्ट असते तर हा देश केव्हाच कोलमडून पडला असता. लोकशाही व निवडणूक पद्धती हीच देशाच्या सध्याच्या स्थितीला जबाबदार आहे. राजकीय पक्ष चालवणे व निवडणुका लढवणे कठीण होत चालले आहे व कोणतीही निवडणूक न लढवता अण्णा हजारे राजकारण्यांना बदनाम करीत आहेत, हे योग्य नाही. अण्णा हजारे यांचा अहंकार हाच त्यांच्या चळवळीचा सर्वात मोठा शत्रू आहे व या अहंकारास खतपाणी घालण्याचे काम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी केले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले महाराष्ट्रातले तीन मंत्री केंद्रात आहेत. अण्णा त्यांची नावे सहज विसरले व पवारांचे नाव घेतले. कारण पवार राळेगणला कधी गेले नाहीत व त्यांनी हजारेंचे तोंडफाट कौतुक केले नाही. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत सगळ्यांनाच उतरायचे आहे, पण स्वत:ची कातडी वाचवून, मेणबत्त्या पेटवून मोर्चा काढणार्‍या पत्रकबाज लोकांच्या भरवशावर कोणतीही लढाई जिंकता येणार नाही. एन.जी.ओ. व त्यांना परदेशातून मिळणारा पैसा ही कोणत्याही लोकआंदोलनाची ताकद होऊ शकत नाही. फेसबुक व ट्विटरवर अण्णांना पाठिंबा मिळाला म्हणजे नक्की काय झाले, ते पाहावे लागेल. दुसरे असे की, जे सिनेअभिनेते अण्णांच्या पाठिंब्यासाठी जंतरमंतर रोडवर आले त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा अधिकार आहे काय? सर्वाधिक काळा पैसा व शोषण सिनेसृष्टीत आहे. हे सर्व लोक कोट्यवधीच्या रकमा स्वीकारतात व तो सर्व ‘ब्लॅक’चा पैसा असतो. या सर्व ब्लॅकवाल्यांनी अण्णांना पाठिंबा दिला यासारखा विनोद नाही!

मतपेटीतून उठाव
अण्णा हजारे हे मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत व त्यांच्या कार्याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. भ्रष्टाचाराने देश गिळला आहे व तो गिळणारी मूठभर घराणी दिल्लीत राज्य करीत आहेत. त्यांच्याच पैशावर राजकीय पक्ष व सरकारे चालतात हे दुर्दैव आहे. लोकांनी मतपेटीतून उठाव करावा व भ्रष्ट सरकार उलथवून टाकावे हाच एक मार्ग आहे. यापूर्वी भ्रष्ट सरकारे पराभूत झाली आहेत व भ्रष्ट राजकारणी तुरुंगात गेले आहेत. ही प्रक्रिया सुरूच असते. न्यायालये व एन.जी.ओ.नी देश चालवला तर राजशकट कोलमडून पडेल! देश बुडविणारा लाखो कोटींचा भ्रष्टाचार डोळ्यास पट्टी बांधून पाहणारे मनमोहन सिंग चांगले व बाकी सगळे वाईट या भूमिकेतून आता बाहेर पडायला हवे. दुर्योधन, दु:शासनाचा स्वैराचार व हस्तिनापुरातील कौरवांचा उच्छाद न रोखणार्‍या धृतराष्ट्रात व मनमोहन सिंगांत फरक दिसत नाही. मुळात कॉंग्रेस पक्ष हेच देशाच्या मुळावर आलेले पाप आहे. या पापाचा पराभव केल्याशिवाय भ्रष्टाचाराचे सैतान गाडले जाणार नाहीत. दिल्लीच्या जंतरमंतर रोडवर या सैतानांचे एजंट फिरत होते. शेवटी प्रश्‍न कायम आहे तो म्हणजे अण्णांचा अमिताभ बच्चन कोणी केला? व जंतरमंतरवर भडकलेल्या ‘शोले’, ‘दिवार’चे दिग्दर्शन, कथा, पटकथा कोणी लिहिली? निर्मात्यांना वाटले दिल्लीत लिबिया किंवा इजिप्त होईल. तसे काहीच घडले नाही. मतपेटीतून लोकांनी क्रांती केली तर अण्णा जिंकले असे म्हणता येईल. त्या क्रांतीत अण्णांनी सहभागी व्हावे. निवडणूक लढवावी. जिंकावे व देशाचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न पूर्ण करावे. अण्णा, निवडणुकीच्या माध्यमातून देशाचे जनलोकपाल व्हा! नाही तर हुकूमशाहीला पाठिंबा द्या!