जीवनातली ही घडी

जीवनातील ही घडी अशीच राहु दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे ॥धृ॥

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळले
स्वप्नातील चांदवा जिवास लाभु दे ॥१॥

हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण कां अर्थ वेगळा
स्पर्शातुन अंग अंग धुंद होऊ दे ॥२॥

पाहु दे असेच तुला नित्य हासता
जाऊं दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे ॥ ३ ॥