कढी गोळे

साहित्य :

 • सायीच्या दह्याचे ४-५ भांडी ताक
 • १ वाटी हरभरा डाळ
 • आलं
 • हिरव्या मिरच्या (बारीक पेस्ट करून)
 • पाव चमचा हिंग
 • १ चमचा जिरे पावडर
 • कढीलिंब
 • फोडणीचे साहित्य
 • डाळीचे पीठ चमचाभर
 • मीठ
 • साखर

कृती :

डाळ प्रथम, धुवून साधारण ४ तास भिजवावी. नंतर रोळीत उपसून ठेवावी. ५ मिनिटांनंतर शक्यतो पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटावी. पण फार बारीक करू नये. वाटून झालेल्या डाळीत मिरचीची पेस्ट किंवा आवडत असल्यास लाल तिखट, हिंग, आले (पेस्ट), हळद, मीठ चवीनुसार घालून एकत्र करून ठेवावे.ताकाला १ चमचा डाळीचे पीठ लावावे. त्यात कढीलिंब, मीठ, आवडत असल्यास साखर, आल्याची पेस्ट घालून कढीचे पातेले गॅसवर ठेवावे. पातेले अर्धे रिकामे असावे. कढी उकळू लागल्यावर वाटलेल्या डाळीचे छोटे गोळे करून कढीत सोडावेत. कढी उकळण्यापूर्वी गोळे टाकल्यास गोळे फुटतात. एक एक करून सर्व गोळे कढीत सोडावेत.नंतर १० मिनिटे बारीक गॅसवर कढी उकळू द्यावी. कढी उतरल्यावर त्यावर तेल, मोहरी, हिंग अशी फोडणी करावी व ती कढीवर घालावी. फोडणीत हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावे. हे गोळे भातात कुस्करून त्यावर फोडणी घालून खाण्याची पद्धत आहे. पोळीबरोबर खाण्यासही चांगले लागतात.