कांद्याची साबुदाणा खिचडी

साहित्य :

 • १ वाटी साबुदाणा
 • १ वाटी चणा डाळ
 • १ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
 • १ वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस
 • १ वाटी बारीक चिरलेला कांदा
 • ४-५ हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • १ लिंबू
 • दीड चमचा मीठ
 • १ चमचा साखर
 • ५ चमचे तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा जिरे
 • पाव चमचा हिंग
 • अर्धा चमचा लाल तिखट (ऐच्छिक)

कृती :

कांद्याची साबुदाणा खिचडी

कांद्याची साबुदाणा खिचडी

चणा डाळ दोनतास भिजत ठेवावी. साबुदाणा धुवून दोन तास झाकून ठेवावा. डाळ धुवून निथळावी व दोन मिरच्या व अर्धा चमचा पीठ घालून वाटून घ्यावी.

कढईत तेल तापले की त्यावर मोहरी, जिरे, हिंग, हळद व उभ्या चिरलेल्या मिरचा व कांदा घालावा. चार-पाच मिनिटे मंद आंचेवर परतावा. कांदा शिजला की त्यावर वाटलेली डाळ घालावी. चारपांच मिनिटे मोकळी होईपर्यंत डाळ परतावी.

नंतर त्यावर भिजलेला साबुदाणा, दाण्याचे कूट, निम्मे खोबरे, मीठ व साखर घालून ढवळावी. मिश्रण कोरडे वाटल्यास चारपाच चमचे पाणी शिंपडावे. झांकण ठेवून वाफ येऊ द्यावी.

साबुदाणा शिजला की मोकळा होईल. वाटल्यास तिखट व चवीनुसार जास्त मीठ घालावे. खिचडी शिजली की खाली उतरवून पाच मिनिटे झाकून ठेवावी. खायला देताना वरून खोबरे, कोथिंबीर घालून लिंबू पिळून द्यावी.