कारागिरी

औरंगाबादच्या हस्तकला
औरंगाबादच्या हस्तकलांचा एक वेगळा गट तयार होतो. आज ४ किंवा ५ कुटुंबे हिमरू विणतात आणि बिदरीकाम करतात. या हस्तकला दुसऱ्या केंद्राकडून औरंगाबादला आल्या त्या मुस्लिम संस्कृतीचा भाग म्हणून. रेशमी वस्त्र वापरण्याला बंदी घालणार्‍या इस्लामी धर्माच्या आज्ञेनुसार हिमरू कापडा खास शोधून काढले गेले. तिथले राजे-शह-याच्यांसाठी हिमरू आणि बिदरीकाम निर्माण करण्यात आले.

आज निर्माण होणारे हिमरू ‘सैल’ विणलेले असते आणि त्यात पक्क्या रंगाचा धागा वापरला जात नाही. बिदरीकाम करणारादेखील चांदी हलक्या दर्जाची आणि कमी प्रमाणात वापरतो. हे किमती खाली आणण्यासाठी केले जाते हे उघड आहे. खपास योग्य अशी बाजारपेठ असेल तरच सुंदर आणि भारी किमतीच्या वस्तू बनवण्याचे धाडस कारागीर करील.

औरंगाबादेत पैलू पाडणार्‍यां कडून मणी तयार करून घेणारा व्यापाऱ्यांचा एक गट आहे याचा उल्लेख इथे केला पाहिजे. ही हस्तकला बदलत्या अभिरूचीनुसार लवकरच नष्ट होईल असे वाटते.

‘महाराष्ट्रात हस्तकला उरलेल्या नाहीत’ हे वारंवार गिरवले जाणारे विधान खरे नाही. मात्र या हस्तकलांची आजक्या तांत्रिक प्रगतीच्या काळात, जाणीवपूर्वक जोपासना झाली नाही तर ते विधान वस्तुस्थितीत उतरेल यात शंका नाही.