कवडा आणि कोंबडे

एका मनुष्याने एक कवडा जाळ्यांत धरिला आणि एका कुंपणात काही कोंबडे ठेविले होते, त्यात त्यास नेऊन सोडले. हा नवा पाहुणा आलेला पाहून कोंबडयांनी त्याला टोचून टोचून फार उपद्रव दिला. पुढे ते कोंबडे जेव्हां आपापसातच लढून एकमेकांचे रक्त काढू लागले तेव्हां तो कवडा आपल्याशीच म्हणतो ‘हे जर आपापसातच इतकी मारामारी करतात तर माझ्यासारख्या परक्यास यांनी त्रास दयावा, यात आश्चर्य ते काय ?’

तात्पर्य:- जे मूळचेच भांडखोर असतात, त्यांच्यापासून सन्मानाची अपेक्षा कोणी करूं नये हे बरे.