खंडोबा आणि शेतकरी

शेतातला कडबा कापताना, त्या कडब्याला जी एक प्रकारची धार असते, तिने शेतऱ्याच्या हातास पुष्कळ वेळा इजा होते. अशा प्रकारची इजा नोकरांस वरचेवर होऊ नये अशी काही तरी व्यवस्था करण्याविषयी एका शेतऱ्याने खंडोबास विनंती केली. तो म्हणाला, ‘देवा ! या कडब्यास जी धार असते ती जर तू नाहीशी करशील तर फार चांगले होईल.’ देवाने ही त्याची विनंती मान्य करून, त्याच्या शेतात जे पीक होते, त्याच्या कडब्याची धार अगदी नाहीशी करून टाकली. पण याचा परिणाम असा झाला की, त्या धारेच्या भयाने जे पक्षी त्या शेतात पूर्वी येत नसत, ते सगळे आता त्या पिकावर तुटून पडले आणि हा हा म्हणता सगळ्या धान्याचा त्यांनी फडशा उडविला ! ते पाहून शेतकरी आपल्याशीच म्हणतो, ‘माझ्या चार दोन नोकरांस त्रास होऊ नये म्हणून मी जी गोष्ट केली, ती शेवटी माझ्या सर्वस्वाचा नाश होण्यास कारण झाली !’

तात्पर्य:- ईश्वराने उत्पन्न केलेल्या पदार्थांची सुधारणा करण्यापेक्षा, ते पदार्थ त्यांच्या मूल स्थितीतच उपयोगी पडतील, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न मनुष्याने अगोदर केला पाहिजे.