कोल्हा आणि शहामृग

एके दिवशी कोल्ह्याने शहामृगास आपल्या घरी जेवावयास बोलावले, आणि त्याची थट्टा करावी म्हणून, खिरीने भरलेले एक सुंदर ताट त्याजपुढे ठेवले. मग दोहींकडून ते दोघे ती खीर खाऊ लागले. शहामृगाची चोच लांब असल्यामुळे, तींतून त्यास खीर खाता येईना, पण तितक्यात कोल्हा ती सगळी खीर खाऊन ताट चाटू लागला ! बिचारा शहामृग आपल्या मनात फार ओशाळा होऊन तसाच उपाशी घरी गेला. पुढे, कोल्ह्याची चांगली खोड मोडावी या हेतूने, शहामृगाने त्यास आपल्या घरी मेजवानीस बोलावले व एका लहान तोंडाच्या बरणीत आंबरस घालून, ते भांडे त्याजपुढे ठेवले. त्या भांडयाचे पोट मोठे पण तोंड लहान असल्यामुळे त्यात कोल्ह्यास आपले तोंड घालता येईना. त्यावेळी, शहामृगाने आपली लांब चोच बरणीत घालून, आंबरस कसा खावा हे कोल्ह्यास दाखवण्याच्या निमित्ताने, सगळा रस खाऊन टाकला. शहामृग आंबरस खात असता, जेव्हा जेव्हा मान बाहेर काढी, तेव्हा रसाचे काही थेंब भांडयावर पडत, ते चाटून कोल्ह्याने कशी तरी वेळ मारून नेली, पण तो मनात फार खट्टू झाला. जातेवेळी तो शहामृगास म्हणतो, ‘गडया, तू जे केलेस ते अगदी यथायोग्य केलेस. मी तुझ्याशी जशी वागणूक केली तशीच तू माझ्याशी केलीस, यात मला वाईट वाटण्याचे काही कारण नाही.’

तात्पर्य:- दुसऱ्याची थट्टा करून समाधान पावणे, हे भल्या मनुष्याचे काम नव्हे; जो असे करतो त्याची मग अशी दुसऱ्याने थट्टा केली असता त्याने चिडू नये.