कोल्हा आणि साळू

एक कोल्हा नदीतून पोहत पलीकडे जात असता, प्रवाहाच्या जोराने बराच खाली बहात गेला आणि पलिकडे एक चिखलाची जागा होती, तेथे जाऊन लागला. पोहण्याच्या श्रमाने दमून गेल्यामुळे, अंमळ विश्रांती घेण्यासाठी तो त्या जागी बसला असता माशांचा एक मोठा थवा येऊन त्याच्या अंगावर बसला. त्या माशांनी चावून आणि गुणगुणून त्यास अतिशय त्रास दिला. जवळच एक साळू बसली होती, तिने हा प्रकार पाहिला आणि कोल्ह्याजवळ येऊन त्यास म्हणाली, ‘दादा, या माशांस मी हाकून लावू काय ?’ कोल्हा म्हणाला, ‘नको, त्या जेथे बसल्या आहेत, तेथेच त्यास खुशाल बसू दया. इतका वेळ माझे रक्त पिऊन त्यांची तहान आता भागल्यासारखीच असल्यामुळे त्यांजपासून मला फारसा त्रास होणार नाही, पण जर यांस हाकलून देशील तर हया जात नाहीत तोच दुसरा माशांचा मोठा थवा येईल आणि माझे रक्त शोषण करू लागेल.’

तात्पर्य:- फार मोठे दुःख टाळण्यासाठी लहानसे दुःख निमूटपणे सहन करणे, हे शहाणपणाचे काम होय.