कोळी आणि रेशमाचा किडा

एका मनुष्याने एका खोलीत काही रेशमाचे किडे पाळले होते. तेथे एके दिवशी एक कोळी एक मोठे जाळे विणीत बसला असता, एक रेशमाचा किडा त्यास म्हणाला, ‘दादा, इतके परिश्रम करून तू हे जे लांबलचक जाळे विणीत बसला आहेस, याचा उद्देश तरी काय?’

कोळी उत्तर करतो, ‘मूर्खा, चूप बैस. असले मूर्खपणाचे प्रश्र विचारून माझ्या कामात व्यत्यय आणू नकोस. मी जे काय करीत आहे ते जगात माझे नांव चिरकाल रहावे, या उद्देशाने करीत आहे.’

हे त्यांचे भाषण संपले नाही तोच, त्या गृहस्थाचा नोकर त्या रेशमाच्या किडयास खाणे घालण्यासाठी तेथे आला, आणि ते कोळ्याचे जाळे केरसुणीच्या एक फटकाऱ्याने त्याने झाडून टाकले.

तात्पर्य: आम्ही आपल्या कृत्यास जेवढे महत्त्व देतो, तेवढेच लोकही देतील असे समजणे हा मूर्खपणा होय.