कोंबडा, कुत्रा आणि कोल्हा

एक कोंबडा आणि एक कुत्रा प्रवास करीत होते. ते एके दिवशी रात्री एका वृक्षाजवळ वस्तीस राहिले. कोंबडा झाडावर चढून बसला व कुत्रा बुंध्यापाशी पडून झोपी गेला. पहाटेस सूर्योदय झाला त्यावेळी कोंबडा मोठयाने आरवला. तो शब्द ऐकून एक कोल्हा त्या ठिकाणी आला. त्याने पाहिले तो कोंबडा उंच झाडावर बसला आहे. मग त्यास फसवून मारून खावे, या हेतूने कोल्हा म्हणतो, ‘अरे, तुझा स्वर किती मधुर आहे ! तुझे गायन ऐकून मी इतका खूष झालो आहे की, तुला एकदा आलिंगन दयावे असे मला वाटते आहे.’ ती त्याची लुच्चेगिरी लक्षात आणून कोंबडा उत्तर करतो, ‘गडया, झाडाखाली जो पहारेकरी निजला आहे, त्यास जागा करून दरवाजा उघडण्याविषयी विनंति कर, म्हणजे तुझी माझी भेट होईल.’ हे बोलणे कोल्हयास खरे वाटून, त्याने कुत्र्यास हाक मारली. ती ऐकताच कुत्रा जागा झाला व त्याने एका क्षणात कोल्हयास मारून टाकले.

तात्पर्य:- साधारण लोकांकडूनही लबाड मनुष्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही.