कृतज्ञता

आतापर्यंत आवश्यक संस्कारांचा विचार झाला आहे. परस्परांची आवश्यकता जाणून व्यवहार हा संस्कार घराघरात झाला तर समाजातील अनेक संघर्ष कमी होतील. असा व्यवहार करणारांसमोर आणखी एक प्रश्न उभा राहतो. त्या मोलकरणीच्या मुलाला, लाडू देणाऱ्याचा भाव समजला नाही तर ? मला जास्त मिळावे हा त्याचा विचार बळावतो व हळूहळू त्याला तो आपला अधिकारच वाटू लागतो. मोठा लाडू मिळाला नाही तर संघर्ष करण्याची, त्यासाठी योग्यायोग्याचा विचार न करता कृती करण्याची त्याची तयारी होते. याची प्रतिक्रिया त्या मुलावर होते. म्हणजेच कृतज्ञताबुद्धीचा संस्कारही आवश्यक आहे. अन तो घरातच होऊ शकतो.

परार्थ व कृतज्ञताबुद्धी दोन्ही असतील तर ‘ त्यजेदेकम कुलस्यार्थे ’ हा विचार अर्थपूर्ण होईल. घराच्या भल्याकरता एका व्यक्तीची आहुती पडली तरी चालेल, अशी मनाची तयारी होईल.