कुत्रा आणि लांडगा

एक कुत्रा आपल्या धन्याच्या दरवाजाबाहेर निजला असता, त्यास एका लांडग्याने पकडले व आता मारून खाणार तोच कुत्रा त्यास म्हणतो, ‘भाऊ, मी हल्ली इतका अशक्त आणि बारीक आहे की, मला मारून खाल्ल्याने तुझे पोटही भरणार नाही; यासाठी थोडे दिवस दम धर.

माझ्या धन्याच्या घरी लवकरच एक लग्न व्हावयाचे आहे, त्यावेळी पुष्कळ खाऊनपिऊन मी चांगला धष्टपुष्ट झाल्यावर तू मला मारून खा, म्हणजे तुझे समाधान होईल.’ लांडग्याने ही गोष्ट कबूल केली व तो निघून गेला. नंतर कांही दिवसांनी तो कुत्रा दाराच्या आत बसला असता, लांडगा त्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, ‘गडया, पूर्वी कबूल केल्याप्रमाणे तू आता बाहेर ये व मरणास तयार हो. मी तुला मारून खाणार. ’ कुत्रा आतूनच उत्तर करतो, ‘भाऊ, मी जर पुनः दरवाजाच्या बाहेर निजलेला तुला सापडलो, तर माझ्या धन्याच्या घरच्या लग्नाची वाट न पाहता, तू मला खुशाल मारून खा!

तात्पर्य:- एकदा प्राप्त झालेल्या संकटांऊन सुदैवाने पार पडल्यावर, पुनः त्या संकटात न पडण्याविषयी खबरदारी देणे हे शहाणपणाचे लक्षण होय.