कुत्रा आणि सिंह

एकदा एक कुत्रा सिंहास म्हणाला, ‘अरे, तुझे आयुष्य किती दुःखमय आहे ! सगळा दिवस भुकेने व्याकूळ होऊन अरण्यात हिंडावे आणि शेवटी काहीच खाण्यास न मिळाल्यामुळे प्रेतासारखे पडून रहावे, ही तुझी स्थिती खरोखरच फार कींव करण्यासारखी आहे. मी स्वतः कसा धष्टपुष्ट आणि सुखी आहे पहा बरे.’ यावर सिंहाने उत्तर दिले, ‘गडया, तू म्हणतोस ते खरे; तुला योग्यवेळी यथास्थित खाण्यापिण्यास मिळते, यात संशय नाही; पण त्याजबरोबरच ही जड साखळीही गळ्यात बाळगावी लागते ! माझे तसे नाही. मला वेळच्या वेळी माझे भक्ष्य मिळो न मिळो, माझी स्वतंत्रता कायम आहे, यातच मला मोठा संतोष वाटतो. गुलामगिरीत राहून तुझ्यासारखी चैन करण्यापेक्षा स्वतंत्रतेत राहून भुकेने मरावे, हेच मला अधिक प्रशस्त वाटते.

तात्पर्य:- दुसऱ्याच्या गुलामगिरीत राहून सुख भोगण्यापेक्षा, स्वतंत्रतेतील दुःख शतपट चांगले.