कुत्रा आणि त्याचा धनी

एका गॄहस्थाचा एक कुत्रा होता, तो हरवला. मग त्या गृहस्थाने जाहिरात दिली की, ‘जो कोणी माझा कुत्रा आणून देईल त्याला मी चांगले बक्षीस देईन.’ त्याप्रमाणे एका मनुष्याने त्याचा कुत्रा त्याला आणून दिला व बक्षीस मिळविले. मग तो गृहस्थ आपल्या कुत्र्यास म्हणतो, ‘अरे, तू किती मूर्ख आणि कृतघ्न आहेस बरे ! मी तुला इतक्या चांगल्या रीतीने वागवीत असता, तू असे पळून जावेस, हा केवळ तुझा दुष्टपणा आहे. मी तुला कधी मारले नाही, शिव्या दिल्या नाहीत, रागे भरलो नाही.’ कुत्रा उत्तर करतो, ‘यापैकी एकही गोष्ट तू स्वतः केली नाहीस हे मला कबूल आहे; पण तुझ्या नोकराने मला अनेक वेळा शिक्षा केली आहे, व ही शिक्षा ज्या अर्थी तुझ्या आज्ञेने करण्यात आली, त्या अर्थी ती तू स्वतःच केलीस असे मी समजतो.

तात्पर्य:- एखादया मनुष्याने दुसऱ्याकडून एखादी गोष्ट करविली, तरी ती त्याने स्वतःच केली असे समजण्यास हरकत नाही.