कुटुंब ३१ ऑगस्टला चित्रपटगृहात

कुटुंब

कुटुंब

काकस्पर्श’ च्या अभूतपूर्व यशानंतर झी टॉकीज आणि महेश वामन मांजरेकर रुपेरी पडद्यावर पुन्हा एक धक्का द्यायला सज्ज झाले आहेत. या प्रसिद्ध जोडगोळीचा ‘कुटुंब’ हा चित्रपट ३१ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होत आहे. स्वप्न पहायला वयाची अट नसते तशीच स्वप्न साकार करायलाही वयाची मर्यादा नसते. परिक्षा कितीही कठीण असली तरी मुलांचे मनोधैर्य वाढवले, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकून त्यांना भक्कम पाठिंबा दिला तर कुठल्याही कसोटीवर मुलं निश्चितच विजय मिळवतात. नामदेव आणि गंगा या अत्यंत साध्या सुस्वभावी जोडप्याची दोन गोड गोजीरवाणी मुलं… या मुलांच्या जिद्दीची, त्यांच्या दिमाखदार यशाची विस्मयचकित करणारी कथा म्हणजे ‘कुटुंब’!!

कुटुंबाला एका मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी नामदेव – गंगांची निरागस गोंडस मुलं आपल्या नृत्यकलेची बाजी लावतात आणि आपल्या स्वयंपूर्ण तेजाने झळाळून उठतात. कुठल्याही कुट्मंबाने एकत्र बसून अनुभवावं आणि आपलं प्रतिबिंब त्यात निरखावं, असं नितळ, पारदर्शी असं हे ‘कुटंब’ पुढच्याच आठवड्यात रुपेरी पडदा व्यापून टाकायला सज्ज झालं आहे.

द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट आणि झी टॉकीज प्रस्तुत या लाघवी कुटुंबात जितेंद्र जोशी, वीणा जामकर, ‘एकापेक्षा एक’ चा विजेता मिहीर सोनी, गौरी इंगवले, वैभव मांगले, भाउ कदम, मानसी नाईक आणि कॉमेडीचा सुपरस्टार सिद्धार्थ जाधव ‘पुन्हा धक्का’ देणार आहेत.

सुदेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा – पटकथा महेश मांजरेकर यांची आहे तर संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाची गीते जितेंद्र जोशी आणि बाबा चव्हान यांची तर त्याला संगीत दिलेय अजित – समीर आणि अभिजीत कवठाळकर यांनी. तर रुपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, अजित परब आणि बेला शेंडे यांनी ती गायली आहेत. याचे नृत्यदिग्दर्शन केलेय उमेश जाधव यांनी.

आपल्या मातीशी, आपल्या मूल्यांशी प्रामाणिक असलेलं… आपल्या कलागुणांचा जाज्वल्य अभिमान बाळगणारं… हसवता हसवता अलवार हृदयाला थेट भिडणारं आणि प्रत्येकाला अंतर्मुख करणारं हे ‘कुटुंब’ येत्या शुक्रवार, ३१ ऑगस्टपासून रसिकांच्या भेटीला येत आहे.

कुटुंब मराठी चित्रपट फोटो

[nggallery id=94]