लेप्टोस्पायरोसिस जाणा व टाळा

लेप्टोस्पायरोसिस,लेप्टो

गेल्या दशकाचे डेंग्यु, एड्स, लेप्टो हे असे नवीनच आजार भारतात दिसू लागले लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) हा आजार तसा १२५ वर्षे जुना जगात इतरत्र सापडणारा, भारतात प्रथम १९३० मध्ये अंदमान बेटावर आढळला. सध्या ओरिसा, कर्नाटक, आंध्र, तामीळनाडू, केरळ, महाराष्ट्र या समुद्रकिनारा लाभलेल्या राज्यांमध्ये दिसतो.

आपण लेप्टो टाळू शकतो. लेप्टो पासून होणारे मृत्यू टाळु शकतो. त्यासाठी लेप्टोचा संसर्ग कसा होतो हे समजावुन घेतले पाहिजे. लेप्टो हा खरातर प्राण्यांचा आजार. उंदिर, ससा, कोल्हा या रानातील व गाय, म्हैशी या पाळीव प्राण्यांना तो होतो. गंमत म्हणजे त्यांचा त्यांना सहसा काही त्रास होत नाही. लेप्टोने सोळा गाई मेल्या अशी बातमी कधी पेपर मध्ये वाचली आहे? प्राण्यांना संसर्ग झाल्यानंतर लेप्टोचे सुक्ष्मरोग जंतु काही महिन्यापर्यंत त्यांच्या लघवीतून बाहेर पडतात. ते चिखलात, साठलेल्या पाण्यात काही आठवडे जिवंत राहू शकतात. अशा साठलेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आला तरच माणसाला हा आजार होऊ शकतो.

हा स्वाईन फ्लू सारखा हवेतून पसरणारा आजार नाही लेग्रर्सा सारखा नजीकच्या सहवासातुन पसरणारा आजार नाही दुषीत अन्नातून तो पसरत नाही. याचे सुक्ष्म रोगजंतु माणसाच्या शरीरात..

  • हातापायांना झालेल्या जखमांमधून
  • साठलेले पाणी पिल्यास ओठांच्या आतील अस्तरातून
  • दुषीत पाण्यात पोहल्यास डोळ्यांमधुन, यामार्गाने प्रवेश करतात.

पावसाळ्यात, विशेषतः भात कापणीच्यावेळी हा आजार साथीचे स्वरुप धारण करतो पण इतर ऋतुं मध्ये सुद्धा एखादा रुग्ण आढळतो भात कापणीच्या वेळी पाणी साठलेल्या शेतामध्ये गेल्यामुळे हा आजार होतो हे सर्वांनाच माहीत आहे पण त्याच वेळी शाळेला जाताना मुद्दाम पाण्यात पाय घालणारी मुले, सुकत घातलेल्या भातात खेळणारी मुले, गाडी धुण्यासाठी दुषीत पाणी वापणारे चालक, गणपती विसर्जनाच्यावेळी पाण्यात उतरणारे गणेशभक्त, गोंठ्यामध्ये जाणारी माणसे व मुले, क्लोरीन वापरुन शुद्ध न केलेल्या पाण्यात पोहणारे, अशा सर्वांना हा आजार झाल्याचे आढळले आहे.

मग हा आजार टाळायचा तरी कसा? हातमोजे व गमबूट घालून शेतात काम करणे व्यवहारीक दृष्ट्या शक्य नाही पण शाळेत जाणाऱ्या मुलांना शेतात येऊ न देणे हे सहज शक्य आहे. साठलेल्या पाण्यात खेळू नको हे त्यांना समजावुन सांगता येते. पोहण्याच्या तलावातील पाणी शुद्ध केले आहे ना? ही खात्री करता येते. नदीच्या वाहत्या पाण्यात गाडी धुण्यापेक्षा सर्व्हीस स्टेशनवर दिलेली बरी. गोठ्यात लहानग्यांना प्रवेशबंदी तर मोठ्यांनी बूट वापरणे योग्य. शेतात काम करणाऱ्यांसाठी आजार टाळण्याचा एक स्वस्त व सोपा मार्ग आहे. तो म्हणजे डॉक्सीसायक्लीन, डॉक्सीसायक्लीन ही गोळी हा आजार टाळू शकते, दर आठवड्यास १०० मीलीग्रॅम च्या दोन गोळ्या घेतल्यास हा आजार टाळता येतो व ही गोळी ज्या भागामध्ये लेप्टो आढळतो तेथे वापरावी असे जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला आहे.

या गोळीची किंमत अतिशय कमी, म्हणजे ५ रुपयांना १० गोळ्याएवढीच आहे. म्हणजे एका वड्याच्या किंमतीत तुम्ही लेप्टो टाळू शकता. ही गोळी मुलांसाठी वापरता येत नाही. ती जेवणानंतर घेण्याची आहे व कमीतकमी दोन ग्लास पाणी त्यावेळी प्याले पाहीजे गोळी घेतल्यावर अर्धा तास तरी आडवे होऊ नये. ही काळजी घेतल्यास तिचा काही त्रास होत नाही. न घेतल्यास पोटात जळजळणे, दुखणे, उलट्या होणे असा त्रास होऊ शकतो. या गोळी संदर्भात आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ न ती चालू करावी. ही गोळी सहा आठवड्यांपर्यंत चालू ठेवता येते. ही गोळी सध्या सरकारी डॉक्टरांकडून वाटप चालू आहे. तशी न मिळाली तरी ती एवढी स्वस्त आहे की त्या साठी सरकारी यंत्रणेवर अवलंबून रहाण्याची गरज नाही.

ही सर्व काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अंग मोडून थंडीताप आल्यास त्याच्याकडे मोड्याचा ताप म्हणून दुर्लश न करता त्वरीत डॉक्टरांची पायरी चढलेली बरी. कावीळ झाल्याची शंका असल्यास वैद्याकडे न जाता डॉक्टरांकडे जाऊन ती लेप्टोची कावीळ आहे का? याची परीक्षा करणे गरजेचे आहे. लेप्टोवर अत्यंत गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे लेप्टो झाल्यावर एक दोन दिवसात चालू केल्यास त्यांना गुण येतो. रुग्ण जेवढा उशीरा येईल तेवढी लेप्टोची व्याप्ती शरीरात पसरलेली असते. तो लिव्हरवर हल्ला करतो. मुत्रपींडाचे काम बंद पाडतो. प्लेटलेट या रक्तातील पेशी खाऊन टाकतो, फुप्फुसे नीकामी करतो अशा अवस्थेत पोहचण्या आधी उपाय होणे महत्त्वाचे आहे. आपण लेप्टो टाळू शकतो, तसे झाल्यास योग्यवेळी योग्य उपचार करुन प्राणहानी टाळू शकतो.