Category Archives: गणपतीच्या गोष्टी

गणपतीच्या गोष्टी | Ganpati Stories

चिंतामणी श्रीगणेश

चिंतामणी श्रीगणेश

चिंतामणी श्रीगणेश

श्रीगणेशाच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे ‘चिंतामणी’. पण हे नाव त्याला कसे काय मिळाले? याचीच ही कथा.

फार पूर्वी अभिजित नावाच्या राजाच ‘गण’ नावाचा एक महादुष्ट राजपुत्र होऊन गेला. हा राजपुत्र असहाय्य लोकांचा, ऋषीमुनींचा अनन्वित छळ करीत असे.

एकदा तो कदंब वनात शिकारीसाठी गेला असता तेथेच असणाऱ्या कपिलमुनींच्या आश्रमापाशी आला. तेव्हा कपिलमुनींनी गणास त्याच्या फौजेसह भोजनास थांबवयास सांगितले. तेव्हा गणास प्रश्न पडला – ‘या मुनींच्या झोपडीत आपल्याला जेवण ते कसले मिळाणार? रानातील कंदमुळे आणि झाडपाल्याची भाजी!’ परंतु थोड्याच वेळत पाहतो तो काय? झोपडीबाहेर अंगणात सुंदर प्रशस्त मंडप उभारला गेला होता. मंडपात प्रत्येकासाठी बसायला सुंदर पाट, समोर सुग्रास भोजनयुक्त चांदीच्या ताट-वाट्या मांडलेल्या होत्या. कपिलमुनींनी गणासह सर्वास आग्रह करुन पोटभर भोजन वाढले.

हा थाट पाहून ‘गण’ आश्चर्यचकित झाला होता. एवढ्या अल्पावधीत या मुनींनी एवढा घाटा कसा उभारला असेल? हे मनात येऊन त्याने कपिलमुनींजवळ चौकशी केली. तेव्हा कपिलमुनी म्हणाले, ‘पूर्वी एकदा मी इंद्राच्या उपयोगी पडल्याने त्यानेच मला इच्छामणी ‘चिंतामणी’ भेट म्हणून दिला’ हे ऐकून गणाने कपिलमुनींजवळ तो मणी मागितला. परंतु कपिलमुनींनी नकार देताच गणानं तो बळजबरीने त्यांच्याकडून नेला.

गणाने चिंतामणी नेल्याने कपिलमुनीस खूप दुःख झाले. त्यांनी भगवान विष्णूची आराधना केली. तेव्हा विष्णूने त्यांना गणेशाची प्रार्थना करण्यास सांगितले. मग कपिलमुनींनी कठोर आराधना करून गणेशास प्रसन्न करून घेतले व घडलेला सारा प्रकार त्यांना कथन केला. तेव्हा गणेशाने ‘गणा’कडून चिंतामणी आणून देण्याचे कबूल केले व गणांवर आपल्या सैन्यासह गणेश चालून गेले.

अभिजित राजाने गणास खूप समजावले. परंतु गर्वान्मन गणाने आपल्या पित्याचे काहीही न ऐकता गणेशावर चढाई केली. दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. गणाचे सारे सैन्य मारले गेले. शेवटी गणेशाने गणावर आपला परशू फेकून मारला आणि गणाचा शिरच्छेद केला. नंतर पित्याकडून तो चिंतामणी घेऊन गणेशाने कपिलमुनीस दिला.

परंतु कपिलमुनींनी तो चिंतामणी गणेशाच्याच गळ्यात बांधला व म्हणाले, ‘गणेशा हा चिंतामणी तुमच्याकडेच राहू द्या!’ यापुढे लोक तुम्हाला ‘चिंतामणी’ म्हणूनच ओळखतील’ असे म्हणून कपिलमुनींनी गणेशास नमस्कार केला.

तेव्हापासून मुळा-मुठा नदीच्या काठावरील कदंबाच्या वनात (थेऊर गावी) येऊन तेथे चिंतामणीचे वास्तव्य झाले आणि विनायक ‘चिंतामणी’ झाला हा थेऊरचा चिंतामणी विनायक अष्टविनायकांपैकी दुसरा विनायक आहे.