Category Archives: लोणची

लोणची | Pickle Recipes

कारल्याचे लोणचे

साहित्य :

 • ४०० ग्रॅम कारली
 • ४-५ चमचे मीठ
 • अर्धी वाटी लोणच्याचा मसाला
 • २ लिंबे

कृती :

कारली सोलून त्याच्या पातळ चकत्या कराव्या, त्यांना दोन चमचे मीठ चोळून एका फडक्यात बांधून साधारण एक तास पोळपाटाखाली दाबून ठेवाव्यात. तासानंतर त्या फोडी एका तसराळ्यात घ्याव्यात. सुटलेले पाणी घेतले नाही तरी चालेल. त्यात लोणच्याचा मसाला, २ चमचे मीठ घालून कालवावे. लिंबाचा रस काढून त्यावर घालावा. दोन दिवसानंतर खायला घ्यावे. महिनाभर हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्यास टिकते.

टोमॅटोचे गोड लोणचे

साहित्य :

 • ४-५ टोमॅटो
 • २ चमचे तेल
 • पाव चमचा मोहरी
 • पाव चमचा जिरे
 • २ चिमट्या हिंग
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचा तिखट
 • ३ चमचे दाण्याचे कुट
 • १ चमचा मीठ

कृती :

टोमॅटोच्या चार किंवा आठ फोडी चिराव्या, कल्हईच्या मध्यम पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे व हिंग व हळद घालून त्यावर टोमॅटो घालावे. जरा अवसडून किंवा अलगद ढवळून मंद आंचेवर शिजू द्यावेत. वर पाण्याचे झाकण ठेवावे, ८-१० मिनिटांनंतर दाण्याचे कूट, तिखट, मीठ व गूळ घालून पुन्हा ढवळावे दोन उकळ्या आल्या की खाली उतरावे. ३-४ दिवस फ्रीजमध्ये टिकते. सॉस‍ऐवजी देखील वापरता येते.

सूचना :

टोमॅटोची साल पुष्कळ मुलांना व मोठ्या मंडळींनाही आवडत नाही. तसे असल्यास प्रथम टोमॅटो मिनिटभर उकडीच्या पाण्यात ठेवून नंतर थंड पाण्यात ठेवावे. पाच मिनिटांनंतर बाहेर काढावे. साल सुटून येते. ती काढून टाकावी व आतल्या गराचे तुकडे करून फोडणीस टाकावे व शिजवावे म्हणजे खाताना सालपटे येणार नाहीत.

आवळ्याचे लोणचे

साहित्य :

 • १ किलो मोठे आवळे
 • २५० ग्रॅम मीठ
 • २५० ग्रॅम तेल
 • १० ग्रॅम मोहरीची डाळ
 • १०० ग्रॅम लाल तिखट (थोडे कमी चालेल)
 • ४ चमचे ओवा
 • ४ चमचे जिरे
 • ५० ग्रॅम सैंधव

कृती :

आवळ्याचे लोणचे

आवळ्याचे लोणचे

आवळे जरा कोचवून दहा मिनिटे वाफवून घ्यावेत. जिर्‍याची कच्चीच पूड करावी. चमचाभर तेलात ओवा जरा परतून घ्यावा.

मोहरीची डाळ बाजारात मिळते ती मोठी असते. थोडा वेळ उन्हात ठेवून जरा कुठावी. त्यात थोडे ( अर्धा वाटी) पाणी घालून फेसावी व त्याची गुळगुळीत पेस्ट करावी.

या फेसलेल्या मोहरीत सर्व मसल्याच्या पुडी, तिखट व हळद घालावी. मीठ सैंधव मिसळावे. एका स्वच्छ बरणीत तळाला थोडे मीठ घालावे. त्यावर थोडे आवळे घालावे. त्यावर मसाल्याचा एक थर द्यावा. त्यावर पुन्हा आवळ्याचा थर व त्यात पुन्हा मसाल्याचा थर द्यावा. शेवटचा थर मसाल्याचा असू द्यावा.

तेल कडकडीत तापवून गार करावे व या मिश्रणावर ओतावे ७-८ दिवस ती बरणी दिवसा उन्हात ठेवावी पंधरा दिवसानंतर वापरायला घेण्या जोग लोणचे तयार होईल.

लिंबाच्या सालीचे लोणचे

साहित्य :

 • २०-२५ लिंबांच्या साली
 • १ वाटी मीठ
 • पाव वाटी लाल तिखट
 • २ वाट्या साखर

कृती :

एका वेळेस इतकी सगळी लिंबे हवीत असे नाही. रोजच्या वापरात लिंबाचा रस काढून झाला की सालीचे चार तुकडे जराशा मीठात घोळवावे व एका घट्ट झांकणाच्या मोठ्या बाटलीत भरावे. साली साठत जातील तशा मीठात घोळवून बाटलीत भराव्या आवश्यक वाटल्यास थोडे जास्त मीठ घालावे.

सर्व जिन्नस एका थाळ्यात किंवा तसराळ्यात कालवावे. बाटलीतल्या सालीही त्यात मिसळाव्या. रुंद तोंडाच्या बरणीत हे मिश्रण भरावे. चौपदरी मलमली फडल्याचा दादरा बांधावा व बरणी ८-१० दिवस उन्हात ठेवावी. संध्याकाळी उचलून घरात ठेवताना बरणी हलवावी. दहा दिवसांनंतर दादरा सोडून झाकण लावावे. झाकणावरून दुसरा दादरा बांधांवा. लोणच्याचा रंग बदलला की ते तयार झाले असे समजावे. आवश्यक वाटल्यास मीठ व साखर थोडी जास्त घालावी.

marathi website

मराठी संकेतस्थळ marathi website

मराठीमातीचे नवीन संकेतस्थळ आवडले का?

 • होय (98%, 1,223 मते)
 • नाही (2%, 31 मते)

एकुण मते: 1,254

Loading ... Loading ...