लिंगाणा किल्ला

लिंगाणा किल्ला Lingana Fort – ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो.

इतिहास : लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाणाचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी आहेत ते फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा. मोऱ्यांचा पराभव केल्यावर शिवाजीने रायगडाजवळ हा किल्ला बांधला. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, एका वेळेस ५० कैदी ठेवत. (रायगडाची जीवनकथा पृ. ३,४) १६६५ सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले. (रायगडाची जीवनकथा पृ. २४) लिंगान्यच्या गिर्दनवाहीचे देव श्रीजननी व सोमजाई हे होत. त्यांच्या नवरात्राच्या उत्सवाच्या रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. (रायगडाची जीवन कथा पृ. १३०) या देवतांना बकरे बळी देण्याची प्रथा होती. (रायगडाची जीवनकथा पृ. १३१) लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता. त्याच्या डगडुजीचे काम रायगडाबरोबरच चालत असे. १७८६ सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये गडावरील सद्र, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार यांचा समावेश असे. ( रायगडाची जीवनकथा पृ. १३५) तेथे पर्जन्यकाळात एक मनुष्य गस्त घाली. (रायगडाची जीवनकथा पृ १३९) रायगड नंतर लिंगाणा पडला. रायगडाच्या खोऱ्यात थोडी विश्रांती घेऊन इंग्रजांचे विजयी सैन्य २३ मे रोजी पाली पलीकडील मार्गास लागले. (रायगडाची जीवनकथा पृ.१८८)

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे सामावून घेते. समोरच दुर्गराज रायगडावराचा स्थितप्रज्ञ जगदीश्वर आपल्यला दर्शन देऊन तृप्त करतो. या गुहेवरून पुढे आपण गेलो की आपण की कोरड्या हौदाला पार करून थोडेसे पुढे चांगल्या पाण्याच्या हौदापाशी येतो. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायऱ्या आहेत ज्यावरती असलेल्या गुहांपर्यंत जातो. इकडे आपल्याला एक बांधकाम नजरेस पडतं, जे अजूनही शाबूत आहे. ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथेदिवा लावत असत, जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे. पण आज ही वाट पूर्णपणे उद्ध्वसत झाली आहे. जाण्याच्या वाटेवरूनच ही वास्तू दिसते. लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायचे म्हणजेवाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येतं. या सुळक्याला सर करायला जवळजवळ ३-४ तास लागतात. काहीथिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे. आता थोडे याच्या इतिहासबद्दल जाणून घेऊ. रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती म्हणजे या गोष्टी या साठी अतिशय अनुकूलआहे. जर कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हाच एक उपाय. गडावरचे दोर आणि शिड्या काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद. गडाचे क्षेत्रफळ सुद्धा कमी, जवळ-जवळ २५० मी. उत्तरेस ज्या पायऱ्या आहेत त्या टाक्यांकडे नेतात. ती वाटही बिकट झाली आहे. आजमितीस ज्या टाक्यातून पाणी भरले जाते तिथे एक शिवलिंग आहे. ते कुठून आले हा प्रश्न पडतो.

गडावर जाण्याच्या वाटा : या गडावर जाण्यास प्रथम आपणास यावे लागते ते महाडला. इथून पाने गावाला जाण्यास सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ४.०० वाजता गाड्या आहेत. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर आणि लिंगाणा माचीवर पोहोचतो. तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर आपल्याला घसरड्या वाटेवरून आपण अर्ध्या तासात आपण लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो.

किल्ल्यावर गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे इथे राहू शकतात. हेच एकमेव रहाण्याचे ठिकाण आहे. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. जाण्यासाठी पायथ्यापासून ८-९ तास लागतात.

सूचना : प्रस्तरारोहण आवश्यक.