आमटे बंधू यांना लोकमान्य टिळक पुरस्कार

डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे

डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे

यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार आमटे बंधूंना म्हणजेच डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर झाला आहे. जे समाजाची व राष्ट्राची निषकाम वृत्तीने सेवा करतात त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. या पुरस्काराचे स्वरुप सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि प्रत्येकी एक लाख रुपये, असे आहे.

१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे पुरस्कार प्रदान केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.

आमटे बंधू यांनी बाबा आमटे स्थापित महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून ‘आनंदवन’, ‘अशोकवन’, ‘सोमनाथ’, ‘लोकबिरादरी’, ‘हेमलकसा’ आदी प्रकल्पांनी सामाजिक आणि रचनात्मक कार्यामध्ये नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासी सेवेत स्वतःला वाहून घेतले आहे. आनंदवनाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलून डॉ. विकास आमटे यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे.