सोमवारपासून मंत्रालयाच्या कारभाराला सुरुवात

मुंबई मंत्रालय

मुंबई मंत्रालय

मंत्रालयातील तीन मजली चांगल्या स्थितीत असून सोमवारपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात बसून राज्याचा कारभार पुन्हा नव्याने सुरु करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर आवश्यक असणारी रंगरंगोटी आणि साफसफाईला सुरुवात केली आहे. पुढच्या ४८ तासांत चबुतऱ्यातील तिरंगा पुन्हा फडकेल आणि मंत्रालय, जे मराठी माणसाचे मानबिंदू आहे ते पुन्हा गजबजून जाईल.

मंत्रालयातील तीन मजली सुस्थितीत असून, आगीचा फटका अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये फारसा बसलेला नाही. त्यामुळे या तीन मजल्यांवरील आणि अ‍ॅनेक्स इमारतीमधील कामकाज सोमवारपासून सुरु करण्यात येईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची कार्यालये पूर्णपणे जळाली आहेत. त्यामुळे कामकाज सुरु करण्यासाठी तात्पूर्त्या स्वरुपात त्यांची कार्यालये खालच्या मजल्यांवर हलविण्यात येणार आहेत. असे समजले आहे की, मुख्यमंत्र्यांसाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचे पहिल्या मजल्यांवरील कार्यालये तर, उपमुख्यमंत्र्यांसाठी दुसऱ्या मजल्यावरील जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचे कार्यालये तात्पूर्ते वापरले जाणार आहे. मंत्रालयासमोरच ज्या मंत्र्यांचे बंगले आहेत त्यांना तेथूनच कारभार चालविण्याबाबत सूचना देण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली की, ‘ज्या चार मजल्यांवर आग लागली होती, तेथे अजून बरेच पाणी साचले आहे. तिसऱ्या मजल्यापर्यंत यातील काही पाणी गळून पडले आहे. त्यामुळे सर्व मजले सोमवारपर्यंत पाण्याने स्वच्छ करण्यात आहे. बाहेरुन इमारतीला रंग लावण्याचे कामही पुर्ण करण्यात येणार आहे. जीटी रुग्णालयामधील ४८ हजार चौरस फूट जागा असलेले आठ मजले, एमटीएनएल इमारतीमधील ३० हजार फूट जागा असलेले तीन मजले पर्यायी व्यवस्था म्हणून ताब्यात घेतले आहेत. सुमारे ८०० कामगार मंत्रालय आणि इतर ठिकाणाच्या स्वच्छतेसाठी तैनात केले आहेत. सरकारचा विचार आहे की लवकारत लवकर ही जागा कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात यावी.’