ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे निधन

साहित्यक्षेत्रात कामगार कवी म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे (८३) यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी ठाणे येथील हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Marathi poet Narayan Surve dies

नारायण सुर्वे

मागील काही दिवसांपासून दम्याचा त्रास होत असल्यामुळे नारायण सुर्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वसन यंत्रणा) ठेवण्यात आले होते.
मुंबईच्या गिरणगावात १५ ऑक्टोबर १९२६ रोजी जन्मलेल्या नारायण गंगाराम सुर्वे यांनी कामगारांचे जीवन अतिशय जवळून अनुभवले होते. अतिशय गरिब कुटुंबात जन्मलेल्या नारायण सुर्वे यांचे बालपण खूप हालाखीचे होते. फुटपाथावर झोपून छोटी-मोठी कामं करत तुटपुंज्या उत्पन्नावर जगलेल्या सुर्वे यांना लिखाणाची आणि कविता करण्याची प्रचंड गोडी लागली.

त्यांच्या १९६६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ माझे विद्यापीठ ’ या काव्य संग्रहात मुंबईत राहणा-या गरिबांचे आणि हालाखीच्या परिस्थितीत जगणा-या कामगारांच्या जीवनाचे वास्तव मांडण्यात आले होते. हा काव्यसंग्रह प्रचंड गाजला. त्यांनी लिहिलेले जाहीरनामा (१९७८), ऐसा गा मी ब्रम्ह, सनद, मानुष कलावंत, आणि समाज, सर्व सुर्वे (वसंत शिरवाडकर संपादीत) हे काव्यसंग्रह देखिल प्रचंड गाजले.

कामगार जीवनाशी असलेल्या थेट संबंध असल्यामुळे कवी मनाचे नारायण सुर्वे यांनी त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून शिकवत असतानाच कामगार चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. १९७०च्या दशकात भारत, तत्कालीन सोवियत रशिया आणि पूर्वेकडील देशांमध्ये सक्रीय कामगार नेते म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली. मुंबईतील कामगार संघटनेत काम करताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष केला. पण या काळातही कवितेशी असणारी मैत्री काही तोडली नाही.

कवितेतून भीषण वास्तव मांडणा-या नारायण सुर्वे यांना १९९८मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना सुवर्ण कमळ आणि १९९९च्या कबीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

परभणी येथे १९९५ मध्ये संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. साहित्य अकादमीवर मराठी साहित्य या विषयासाठी नेमलेल्या सल्लागार समितीवर समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.