महाराष्ट्र सीईटीत मराठवाडा अग्रस्थानी

मराठवाड्याची सीईटीत बाजी

महाराष्ट्र सीईटी

मराठवाड्याने इंजिनीअरिंग आणि मेडिकलच्या महाराष्ट्र सीईटी परीक्षेत प्रथम स्थान मिळवले आहे. जालन्याची माधवी इंदानी हीने मेडिकलच्या सीईटीत १९८ गुण मिळवले व राज्यात पहिली आली आहे. तर लातूरचा पुष्कर नारसीकर याने इंजिनीअरिंग सीईटीत १९६ गुण मिळवून टॉपर ठरला आहे.

मुंबई विभागात वझे-केळकर कॉलेजचा मुस्तफा कारी याने मेडिकलच्या सीईटीत १९५ गुण मिळवून पहिला आणि राज्यात चौथा आला आहे. इंजिनीअरिंग सीईटी मध्ये मुंबई विभागाच्या यादीत मिठीबाई कॉलेजची भैरवी मेहता ही १९५ मिळवून पहिली तर राज्यात दुसरी आली आहे. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एकूण २,१५,५८० विद्यार्थ्यांनी तर इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासठी २,८०,०४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

ही परीक्षा उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या तीन विभागांमध्ये घेण्यात येते. उर्वरित महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञानातील १२.२२ टक्के विद्यार्थी एमबीबीस आणि डेंटल प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या प्रवेशासाठी विदर्भातील १३.०८ टक्के तर मराठवाडा विभागातील १७.१९ टक्के विद्यार्थी पात्र होणार आहेत. यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे.

एमबीबीएस आणि डेंटल प्रवेशासाठी उर्वरित महाराष्ट्र विभागात १५.८७ टक्के मुली तर विदर्भातून १५.२४ टक्के आणि मराठवाड्यातून २२.३२ टक्के मुली पात्र ठरल्या आहेत.