मेलेला हत्तीच जिवंत हवा

चन्नापट्टम येथे शेट्टी नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. त्याने आपल्या मुलाच्या लग्नातील वरातीसाठी, पापामिया नावाच्या एका माणसाचा हत्ती भाड्याने घरी आणला, परंतू प्रत्यक्ष नवरा-नवरीची वरात निघण्यपुर्वीच तो हत्ती अकस्मात मेला ! शेट्टी हा पापामियाला हत्तीची किंमत किंवा नवा हत्ती विकत द्यायला तयार होता, पण पापामिया म्हणू लागला, ‘मला माझा मेलेला हत्तीच जिवंत करुन हवा.’ अखेर ते प्रकरण न्यायमुर्ती तेनाली रमण यांच्याकडे गेले, त्यांनी दोघांचेही म्हणणे ऎकून घेतले आणि ‘उद्या निर्यण देतो’ असे म्हणून शेट्टी व पापामिया यांना घरी जायला सांगितले.

त्याच दिवशी रात्री रमण यांनी शेट्टीला आपल्या घरी बोलावून घेतले व त्याला सांगितले, ‘हे पाहा शेट्टी ! उद्या न्यायालयात तू आपणहून येऊ नकोस. पापामिया तुला बोलवायला तुझ्या घरी येईल, तेव्हाच ये. तत्पूर्वी सकाळी तू आपल्या घराचा पुढला दरवाजा आतून कडी न लावता, नुसताच पूर्ण बंद करुन घे, आणि त्याच्या आतल्या बाजूला त्याला लागून एकावर एक अशी पाच-सहा मडक्यांची उभी दूड रचून ठेव. न्यायालयात पापामिया आला, की मी तुला बोलावण्यासाठी तुझ्या घरी पाठवीन. तो तुझ्याकडे आला, आणि तुला आणि हाका मारु लागला, तरी तू त्याला ‘ओ’ देऊ नकोस. मग तो पुढला दरवाजा ठोठावू लागेल. त्याने तसे केले की, आतल्या बाजूची मडक्यांची दूड त्या दरवाज्याच्य धक्क्याने कोसळून ती मडकी फ़ुटुन जातील. तसे झाले की, फ़ुटलेली मडकीच आपल्याला मूळच्या चांगल्या स्थितीत मिळावी, यासाठी तू न्यायालयात येऊन पापामिया विरुध्द दावा नोंदव. पुढं काय करायचं ते मी पाहून घेईन,’

आणि योजले, तसेच झाले. पापामिया हा शेट्टीला बोलवायला त्याच्या घरी गेला; त्याला हाका मारुनही तो ‘ओ’ देईना म्हणून त्याने पुढला दरवाजा ठोठावला आणि दरवाजाच्या आतल्या बाजूस टेकवून ठेवलेली मडक्यांची दुडच्या दूड फ़ोडून बसला. साहजिकच शेट्टी त्याच्यासंगे न्यायालयात आला, पण त्याने त्याच्याविरुध्द आपला दावा नोंदवला !’ मी घेईन तर घेईन, तीच फ़ुटलेली मडकी मुळात होती तशी घेईन !’ असे तो पापामियाला म्हणू लागला.

पापामिया व शेट्टी या दोघांचे म्हणणे पुन्हा एकदा ऎकूअन घेऊन न्यायमुर्ती रमण शेट्टीला मुद्दाम म्हणाले, ‘शेट्टी ! अरे काय हा तुझा पोरकटपणा ! मडकी ती काय, आणि ती या पापामियानं फ़ोडल्याबद्दल याच्याविरुध्द दावा?’शेट्टी -न्यायमुर्ती, माझी मडकी साधी नव्हती हो ! खापरपणजोबांकडून पणजोबांकडेम त्यांच्याकडून आजोंबाकडे, त्यांच्याकडून वडिलांकडे आणि मग माझ्याकडे अशी परंपरेनं ती माझ्याकडे आली होती, आणि तशी ती माझी दिव्य मडकी या पापामियानं फ़ोडली. तेव्हा ती मला मूळच्या स्थितीतच हवी आहेत.

पापामिया – पण मी ती मडकी मुद्दाम कुठे फ़ोडली? दरवाजा ठोठावताच त्याच्या धक्क्यानं आतल्या बाजूला असलेली ती दूड कोसळली आणि ती मडकी फ़ुटली !शेट्टी -मग मी तरी तुझा हत्ती मुद्दाम कुठे मारला ? घरी आणताच तो आपणहून कोसळला आणि गतप्राण झाला.न्यायमुर्ती रमण – पापामिया ! तू याची मडकी होती तशी याला करुन देऊ शकतोस का ?

पापामिया – ते कसं शक्य आहे ?

न्यायमुर्ती रमण – मग तुला ज्याप्रमाणे त्याची फ़ुटकी मडकी जशी होती तशी करुन देता येणे शक्य नाही, त्याचप्रमाने त्यालाही तुझा मेलेला हत्ती होता तसा जिवंत करुन देता येणे शक्य नाही. तेव्हा ‘तू त्याची फ़ुटलेली मडकी होती तशी करुन अथवा त्याला नवीन घेऊन देऊ नये, आणि या शेट्टीनेही तुझा मेलेला हत्ती जिवंत करुन, अथवा नवा हत्ती विकत घेऊन तुला देऊ नये.’ असा मी निर्णय देतो.

शेट्टी हा नवा हत्ती अथवा त्याची किमंत देत असता, आपण मुर्खपणा केला व भलता हट्ट धरला, म्हणून आपण आपले असे नुकसान करुन घेतले, या विचारानं पापामिया खजील झाला व खालच्या मानेने घरी गेला.