एक म्हातारी आणि तिच्या दोन मुली

गुजराथेत एक म्हातारी रहात असे, तिच्या दोन मुलीपैकी एक मुलगी मरण पावली, तेव्हा पैसे देऊन काही बायका रडावयास आणल्या. त्यांनी आपले ऊर बडवून आणि मोठमोठयाने हेल काढून रडण्याचा एकच हलकल्लोळ केला. घरच्या माणसांपेक्षा बाहेरच्या माणसांचे मृताबद्दलचे हे दुःख पाहून दुसऱ्या मुलीस फार आश्चर्य वाटले व त्यासंबंधाने तिने आपल्या आईस प्रश्न केला. म्हातारी म्हणाली, ‘मुली, आमचे दुःख सहज आहे; पण यांचे तसे नाही. त्यांना त्याबद्दल पैसे दिले असून, त्या पैशाचा योग्य मोबदला देत आहेत असे दाखविण्यासाठी त्यांना तसे करणे भाग आहे.’

तात्पर्य:- नुसती आरडाओरड करून ऊर बडविणे हे दुःख प्रदर्शनाचे खरे लक्षण नव्हे; तर ते दुःख अश्रूंवाटे बाहेर पडले व त्याचा मनावर आणि शरीरावर परिणाम झाला पाहिजे.