मिठाची मिठ्ठास कामगिरी

इटलीतील एक ख्यातनाम परंतू गरिब चित्रकार बफ़ालमॆके याने एका लंब बैठ्या खोलीत राहण्यासाठी जागा घेतली.योगायोग असा की नेमका त्याच्या लगतच्या खोलीत हातमागावर लोकरीचं कापड विणणारा विणकर राहत होता. हा विणकर तासा चांगला सुखवस्तु असला तरी, अतिशय लोभी व निर्दयी होता. तो आपल्या बायकोला मध्यरात्रीपर्यंत हातमागावर कापड विणायला लावी व स्वत: मात्र गाढोगाढ झोपा जाई. रात्रीच्या निवांत वेळी चालविल्या जाणार्‍या हातमागाच्या खडखडात त्या चित्रकारालाही निवांट झोप घेणे अशक्य होऊ लागले. अखेर विचार करुन त्याने एक युक्ती शोधून काढाली.

त्याच्या या विणकराच्या खोल्यांच्या मधल्या खोलीच्या सामाईक भिंतीवर चुलीच्या वर मधोमध भोक पडलं होतं. विणकराच्या बायकोने स्वंयपाकाला सुरुवात केली की, हा चित्रकार बांबूच्या पोकळ नळीत बरचंस मिठ घालून तयार राही, आणि विणकराची बायको चुलीवर आमटीच पातेलं ठेवून कारणपरत्वे पुढल्या खोलीत गेली रे गेली की, तो त्या भगदाडातून बांबूची नळी आरपार घालून व आतल्या बाजुने त्या नळीला जोराची फ़ुंक्र मारुन ते सर्व मीठ आमटीत टाकी. मग तो ती नळी पटकन आतल्या बाजुला ऒढून घेई. त्या चित्रकाराला हा प्रयोग तीन दिवस करावा लागला.

आमटी खारटं झाली म्हणून त्या विणकराने आपल्या बायकोला साध्या शिव्या दिल्या. दुसर्‍या दिवशी पुन्हा आमटी खारट झाली म्हणून त्याने अगदी भारीतल्या भारी शेलक्या शिव्या दिल्या. पण तिसर्‍या दिवशीही आमटी आणखी खारट झाली असल्याचे पाहून जेव्हा रागाच्या भरत तो त्याच्या बायकोला मारायला गेला, तेव्हा तो चित्रकार पटकन तिथे जाऊन म्हणाला, अरे तू माणूस आहेस की कोण आहेस, दिवसभर स्वयंपाक, तुझी व मुलांची सेवा करणार्‍या बायकोला तू जर रात्र रात्र जागायला लावून हातमाग चालवयला सांगतोस, तर पुरेशा झोपेच्या अभावी तिच्या हातून आमटीत जादा मीठ पडेल नाहीतर काय होईल ? तू जागून पाहा ना एक दिवस ?’

चित्रकाराच्या या म्हणण्याला तोवर तिथे जमलेल्या इतर शेजार्‍यांनीही हार्दिक पाठिंबा दिला. त्यामूळे लज्जीत झालेल्या त्या विणकराने त्या दिवसापासून बायकोला रात्री हातमाग चालवायला सांगण्याचे बंद केले. साहाजिकच त्या चित्रकाराला तिथून पुढे गाढ निद्रेचे सुख मिळू लागले.