मनसेने घातली सूरक्षेत्रवर झडप

राज ठाकरे आणि आशा भोसले

राज ठाकरे आणि आशा भोसले

‘कलर्स’ आणि ‘सहारा वन’ या चॅनेलवर चालणारी संगीत स्पर्धा ‘सूरक्षेत्र’ ही मनसेची शिकार झाली आहे. या कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तानी स्पर्धकांमध्ये गायनाचे युद्ध दाखवले जात आहे. या कार्यक्रमात आशा भोसले परीक्षक आहेत आणि मनसेने त्यांना विनंती केली आहे की त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊ नये.

‘सुप्रीम कोर्टानेही स्पष्ट केले आहे की २६/११ च्या हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. त्यामुळे पाकिस्तानी कलावंतांना या कार्यक्रमातून हाकलवून द्यावे’, अशी मागणी मनसेच्या चित्रपट सेनेने केली आहे. मनसेने इशारा सुद्धा दिला आहे की जर ही मागणी मान्य झाली नाही तर, चॅनेल आणि या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप देणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आंदोलन करण्यात येईल.

‘राजगड’ येथे मनसे चित्रपट सेनेच्या प्रमुख शालिनी ठाकरे आणि पदाधिकारी अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि कडक शब्दांत ‘सूरक्षेत्र’चा विरोध केला. यावेळी शालिनी ठाकरे म्हणाल्या की, ‘आम्ही सुरुवातीपासूनच पाकिस्तानी कलाकारांनी भारतात येऊन काम करण्यास कठोर विरोध दर्शविला आहे. २६/११च्या हल्ल्यानंतर भारतातल्या नागरिकांचा पाकविरोधात अत्यंत क्रोध आहे. आज भारतात अनेक कलाकार गायक होण्याची एक संधी मिळवण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यांना सोडून पाकिस्तानी कलाकारांना इथे येऊन गायनाची संधी देण्याची काय गरज आहे? आशाताई म्हणतात की त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भक्त आहेत. असे जर आहे तर त्यांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये. त्यांच्या या वागण्यामुळे देशातील नागरिकांच्या भावनेला ठेच लागत आहे’.

दरम्यान, बोनी कपूर हे सहारा वनच्या संचालकांपैकी एक संचालक आहेत. त्यांनी शालिनी ठाकरे यांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या विरोध करण्यापासून मागे हटणार नसल्याचे  त्यांनी सांगितले.

आशा भोसले यांचे मत
‘मला राजकारणातील काहीही समजत नाही. मी एक गायिका असून महाराष्ट्राचीच आहे. माझे राजवर खूप प्रेम आहे. त्याने मला शिव्या जरी दिल्या तरी त्याला माझे गाणे आवडते, हे मला माहित आहे. ‘अतिथी देवो भव’ ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. माझे त्या माणसावरही प्रेम आहे ज्याच्यामुळे आज आपण महाराष्ट्रात मान वर करुन चालू शकतो. मी त्यांचे नाव घेणार नाही पण आपल्याला समजले असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. त्यामुळे राजने कलावंतांमध्ये राजकारण आणू नये.’

राज ठाकरे यांची टीका
‘मंगेशकर कुटुंबातील प्रत्येक गायक हे महाराष्ट्राला लाभलेली रत्न आहेत. मी लता दीदी, आशाताई यांचा खूप आदर करतो पण, आशाताईंनी असे वागू नये. वास्तविक पाहता त्यांचे वय लक्षात घेता त्यांनीच आम्हाला हे उपदेश करायला हवेत. हे कसले ‘अतिथी देवो भव’ म्हणे? हा तर ‘पैसा देवो भव’ आहे. तसे तर मग कसाबच्याही वेळेला म्हणायचे होते, ये रे बाबा, अतिथी देवो भव’.