मान्सूनने घेतली तीन दिवस सुट्टी

पावसाचे प्रमाण कमी

राज्यातल्या पावसाने किमान तीन दिवस तरी सुट्टी घेतली आहे. चीनच्या दक्षिणेकडील समुद्र आणि प्रशांत महासागरातील दोन चक्रीवादळात मान्सून फसला असल्याने असे झाले आहे. वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे की, आता नुसत्या सरींवरच समाधान मानावे लागेल.

भारतात मान्सून घेऊन येणारा वाऱ्याचा प्रवाह चक्रीवादळाच्या दिशेने वळला असून अचानक वातावरणात बदल झाला आहे. पुणे वेधशाळेच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले की, मान्सून तेव्हाच सक्रीय होईल जेव्हा हे चक्रीवादळ निघून जाईल.

नैऋत्य दिशेकडून येणारा वाऱ्याचा जोरही कमी झाला आहे. मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक डॉ. एन. वाय. आपटे यांनी सांगितले की, दक्षिण कोकणात अतिवृष्टी झाली आहे पण राज्यात इतरत्र पावसाचा जोर कमी झाला आहे.

मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात १०४ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या ७४ टक्के पाऊस झाला आहे खरीपाच्या क्षेत्रावर २.२४ लाख हेक्टर म्हणजे २ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पावसाचे प्रमाण बरेच कमी आहे. केवळ तेरा टक्के राज्याच्या धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या पावसाविषयीची चर्चा झाली. खान्देश वगळता राज्याच्या बहुतांश भागांत मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. गतवर्षी राज्यात १०९ टक्के पाऊस झाला होता पण यावर्षी फक्त ७४ टक्के पाऊस झाला आहे. १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये झाला आहे. रत्नाहिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांमध्ये ८० ते १०० टक्के पाऊस झाला आहे. रायगड, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, नागपूर, भंडारा, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ६० ते ७० टक्के पाऊस झाला आहे. ४० ते ६० टक्के पाऊस ठाणे, धुळे, अहमदनगर, सोलापूर, हिंगोली, गोंदिया, या जिल्ह्यांत झाला आहे. नंदूरबार, जळगाव, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, गडचिरोली, या जिल्ह्यांत ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

भाताची पेरणी सरासरी क्षेत्राच्या ४ टक्के झाली आहे तर कापसाची पेरणी ५ झाली आहे. मका, भुईमाग या पिकांची पेरणी केवळ १ टक्का क्षेत्रावर झाली आहे. यावर्षीच्या तुलनेत मागील वर्षी ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन अशा पिकांच्या जोरात पेरण्या झाल्याहोत्या.