आला रे आला पाऊस आला

नागरिकांना अधिक प्रतिक्षा करायला न लावता केरळ मध्ये दाखल झाल्यानंतर, मान्सून बुधवारी दक्षिण कोकणासह, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत दाखल झाला. वेधशाळेने राज्यातील उर्वरित भागांमध्ये पाऊस पोचण्यासाठी हवामान अनुकूल नसल्याने पावसाच्या प्रगतीत खंड पडण्याची शक्यता दर्शविली आहे.

राज्यातील लोकांना मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता होती. कर्नाटक किनारपट्टीपासून केरळ पर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र व वार्‍यांचा प्रभाव यामुळे राज्यात २४ तासांच्या आत मान्सूनचे आगमन झाले. संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, उत्तर कर्नाटकचा अंतर्गत भाग, गोवा, कोकण (सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा) आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यापर्यंतचा काही भाग बुधवारी मान्सूनने व्यापला आहे.

‘हवामान मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल नाही. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीबद्दल समजत नसले तरी, मान्सूनने दोन दिवसांत वेगाने प्रवास केल्यामुळे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल,’ हवामान विभागाच्या उप-महासंचालक डॉ. मेधा खोले यांनी ही शक्यता दर्शविली आहे.