मुलांचा अभ्यास आई मार्गदर्शक

पूज्य विनोबा भावे यांनी श्रीकृष्ण चरित्रातील एक मार्मिक कथा शिक्षणाच्या संदर्भात सांतितली आहे. कथा अशी आहे की, सांदपनी ऋषींच्या आश्रमातून विद्याभ्यास संपल्यावर श्रीकृष्ण जेव्हा परत स्वगृही जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी, सांदिपनीच्याच इच्छे नुसार, एक वर मागितला. श्रीकृष्ण म्हणाले, “ गुरुवर्ग, मी कुथेही असलो तरी मला आईच्या हातचे भोजन मिळावे; ‘मातृहस्तेन भोजनम’ असा वर म्ला मिळावा.” आईच्या हातच्या जेवणाची गोडी श्रीकृष्णांना अवीट वाटत होती. या कथेत थोडी भर घालून विनोबांनी असे म्हटले आहे की, शिक्षणाबाबतही असेच आहे. शिक्षण कुणालाही व कुठेही मिळाले तरी ते आईच्या सुखाने मिळावे. आईने दिलेले शिक्षण हे नैसर्गिक वत्सल्याने भरलेले असते. त्यात मातेच्या प्रेमाचा जिव्हाळा असतो. खऱ्या शिक्षकाला मातृहृदयी बनल्याशिवाय चांगले शिक्षण देता येणे शक्य नाही.स्त्री ही एका अर्थाने जातिवंत शिक्षकच असते.

अवघड कार्य
पण ही स्त्री जेव्हा पालकाच्या भूमिकेतून आपल्या मुलाकडे पाहू लागते तेव्हा भूमिका बदलतात. कर्तव्य कठोरतेपेक्षा प्रेमाचा जिव्हाळा व आत्मीयता पालकत्वाच्या भूमिकेत अधिक असते. त्यामुळे आपल्या मुलाला त्याच्या विद्यार्थीदशेत मार्गदर्शन करताना अनेकवेळा लहान मोठ्या अंतरगत मानसिक संघर्षातून जावे लागते. तिला बऱ्याचवेळा कठोर शिक्षकही होता येत नाही व कठोर पालकही होता येत नाही. आपल्या पाल्याच्या उणिवा दिसत असतात. पण त्या उणिवा कोणी तिऱ्हाइताने प्रकर्षाने दाखविल्या तर आईला ते रुचत नाही. म्हणून आपल्या पाल्याला अभ्यासात मार्गदर्शन करण्याचे काम आईच्या दृष्टीने अवघड होऊन बसते.

पूर्वप्राथमिक शाळेतील पूर्वतयारी
वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून तो पाचव्या वर्षापर्यंत मूल हे पूर्वप्राथमिक शाळेत जाते. हे वय मुलाला शिक्षणाला सन्मुख करण्याचे असते. जगाची ओळख करून देण्याची जबाबदारी या वयात प्रामुख्याने आईचीच असते. पाठांतराने मुलांच्या बुद्धीला धार चढते व त्याची शब्द संपदाही नकळत वाढते. घरात मातेने गाईलेली गीते वारंवार कानावर पडूनही मुलांना काही प्रेरणा मिळत असतात. असे संस्कारक्षम व निवडक पाठांतर बालवयात आपल्या पाल्याकडून करूनघेणे ही अभ्यासाची एक पूर्वतयारीच होय. विविध फळांची फुलांची नावे मुलांना सांगणे, विविध रंगाची ओळख त्यांना करून देणे, पशूपक्ष्यांच्या नावांशी त्यांचा परिचय करून देणे, धान्यांचे विविध प्रकार ती मुले ओळखू शकतील अशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करणे हीसुद्धा आईकडून मुलांच्य अभ्यासाची पूर्वतयारीच ठरेल. पूर्वप्राथमिक शाळांतून प्रवेश घेताना आज या छोट्या मुलांनाही मुलाखतीच्या दिव्यातून जावे लागते.

प्राथमिक शाळेत कोनती कौशल्ये हवीत ?
पूर्वप्राथमिक शाळेत मुलांच्या प्राथमिक शाळेतील अभ्यासाची पूर्वतयारी होत असते. मुलाच्या बोलण्यातून त्याची भाषिक कौशल्य प्रकट होत असतात. तर त्याच्या हालचालीतून खेळातून त्याची शारीरिक कौशल्ये व्यक्त होत असतात. ही कौशल्ये वाढावीत, त्यांना योग्य वळण लागावे म्हणून मातांना आपल्या घरीही अनेक गोष्टी करता येतील. बडबड गीतांची, बालगीतांची अनेक सुंदर आकर्षक पुस्तके मुलांच्या हाती त्या देऊ शकतील. त्यातील गाणी गाऊन मुलांमध्ये त्या गाण्याची गोडी निर्माण करू शकतील व त्या गीतांना योग्य अशा अभियनाची. मर्यादित का होईना, जोड देऊन मुलांच्या आत्मविष्काराला प्रेरणा देऊ शकतील. विव्ध आकाराच्या रंगाच्या, स्पर्शाच्या वस्तूची हसत खेळत पन जाणीपूर्वक ओळख मुलांना करून देण्याचे कामही मातांना सहज सवय आहे. अक्षरांच्या व चित्राच्या माध्यामातून आपले विचार व भावना व्यक्त करण्याची फार मोठी ऊर्मी मुलांच्या मनात असते. अशावेळी घरात एखदा मोठा लाकडी वा गुंडाळा फळा व खडू त्या मुलांच्या हाताला सहज लागेल अशा पद्धतीने ठेवला तर मुलांच्या भावाविष्काराला तो अतिशय उपकारक ठरतो. तसेच पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये होणाऱ्या विविध विषयांच्या स्पर्धातून भाग घेण्यासाठी मातांनी मुलांना प्रोत्साहन दिले तर मुलांच्या भावनांचा परिपोष होण्यास आणित याचे मन समाजसन्मुख बनण्यास त्याचा फार उपयोग होऊ शकेल.

आज अभ्यासक्रमही बदलत आहे व अध्यापन पद्धतीतही बदल होत आहेत. त्यामुळे पालकांची अनेक द्रुष्टीने कुचंबणा होते स्वाभाविक आहे. शिक्षणाच्या सर्व स्थरावर हे घडत आहे. पण त्यामुळे निराश व निष्क्रिय होण्याचे कारण नाही. सुशिक्षित मातांना यातून अनेक पद्धतीनी मार्ग काढता येईल. स्वतः अभ्यास करून, शिक्षक पालक संघाचे सदस्यात्व पत्करून, शिक्षकांशी वैयक्तिक संपर्क साधून मातांना या अडचणीतून निश्चित मार्ग सापडू शकेल. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा गणित हा विषय चांगला करून घेण्यासाठी सम्ख्येवर आधारित बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार अशी चार कृत्ये निश्चितपणे करून घेता येतील. मुलांना तोंडी विशेष चटकन व बिनचूक करता यावेत म्हणून अनेक पद्धती अवलंबिता येतील. पैशाचे छोटेछोटे व्यवहार आपल्या देखरेखीखाली करू देण्याचे स्वातंत्र्य आपन मुलांना देऊ शकाल. भाजी विकत घेताना, कार्ड पाकीटे विकत घेताना मुलांना हा पैशाचा व्यवहार प्रत्यक्ष दाखविता येईल. बाजाराट आपल्या बरोबर नेऊन विविध वस्तूंचे भाव व खरेदी केलेल्या वस्तू यांची सांगड घालून त्यांना हिशेब करण्यास प्रोत्साहन देता येईल. खरेदी केलेल्या मालांची बिले मुलांना दाखवून खरेदी विक्रीच्या व्यवहाराची ओळख चांगल्या प्रकारे करून देणे शक्य होईल.

इतिहास विषयाची गोडी केवळ पाठ्यपुस्तकाच्या वाचनामुळे मुलामध्ये निर्माण होणे अवघड आहे. त्यासाठी इतिहास ज्या पुस्तकांतून कथारूपाने सांगितला आहे असी पुस्तेके मुलांना आणून दिली तर निश्चित उपयुक्त ठरतील. नकाशाच्या ‘आराखडा-वही’ वरून भूगोल समजावून सांगितला तर मुलांना तो विषय चटकन कळतो. अशा आराखड्याच्या वह्या त्यांच्या हाती आपन देणे आवश्यक आहे. ‘प्रयोगातून विज्ञान’ यासारखी पुस्तके मुलांच्या ठिकाणी शास्त्र विषयाची गोडी तर निर्माण करतातच, पण त्यांना शास्त्रीय दृष्टीही देतात. मुलांना स्वयं अध्ययनासाठी आवश्यक ते साहित्य पुरविण्याकडे मातांनी लक्ष देणं ही आजची फार मोठी गरज होऊन बसली आहे.

अप्रत्यक्ष नैतिक धाक म्हणजे प्रेरणाच
प्राथमिक शाळेत आणि माध्यमिक शाळेत मुलांची श्रद्धा त्यांच्या शिक्षकांवर आई, वडिलापेक्षाही अधिक असते. हा अनुभव आहे. मुलाच्या वर्गातील अभ्यासाच्या वह्या पाहण्यासाठी मुद्दाम मागणे, त्याने केलेल्या गृहपाठावर लक्ष ठेवणे, त्याच्या प्रत्येक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जतन करून ठेवणे वृत्तपत्रांतून शालेय अभ्यासावर प्रसिद्ध होणारे अध्यापन पाठ या लेखन यांची कात्रणे काढून ती व्यवस्थित लावून ठेवणे आणि त्यांचा उपयोग करण्यास आपल्या पाल्याला प्रव्रुत्त करणे-अशा कितीतरी गोष्टी मातांन करता येतील. एस. एस. सी. बोर्डात दुसऱ्या क्रमाकांने उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याच्या आईने त्याच्या पाचवीपासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जपून ठेवल्याचे मला दाखविले होते. आपल्या मुलाच्या अभ्यासाच्या प्रगतीला हा आलेख पाहणे मुलाला व मातेलाही मोथे प्रेरक ठरत असते. मुलांना आणखी प्रेरणा मिळते ती आईच्या वा वडिलांच्या अब्यासातील विशेष कर्तृत्वामुळे ! म्हणून ज्या मातांना आपल्या शालेय जीवनात चांगले क्रमांक मिळाले असतील, खेळात वा सांस्कृतिक कार्यक्रमात बक्षिसे मिळाली असतील ती बक्षिसे मुलांना नकलत प्रेरक ठरत असतात. अहंकाराचा स्पर्श होऊ न देता ती बक्षिसे मुलांच्या मनी ठ्सतील अशा कौशल्याने दाखविली गेली पाहिजे. दहावीच्या महत्त्वाच्या वर्षी आपल्या मुलाच्या सर्व शक्ती अभ्यासाकडे केंद्रित व्हाव्यात म्हणुन मुलाला घरातील बारीक बारीक कामातून मुक्त करणे मातांना सहज शक्य होईल. काही वेळ तर घरात काही निग्रहाचे, संयमाचे वातावरण उत्पन्न करणे आवश्यक होऊन बसते. काही चैनीच्या, शरीरसुखाच्या गोष्टी कटाक्षाने दूर ठेवणे इष्ट ठरते. परीक्षेच्या महत्त्वाच्या वर्षात वा कालखंडात घरातील टी.व्ही. आपण स्वतःही पाहाण्याचा मोह आवरला व त्यामुळे मुलाचा अभ्यास चांगला झाला असे सांगणाऱ्या माताही भेटतात. माध्यमिक शाळात जाणाऱ्या वाढत्या वयाच्या मुलाची व मुलीची शारीरिक व मानसिक अवस्थांतरे ध्यानी घेऊन त्यांना योग्य वळण देणे ही जबाबदारी मुख्यतः मातांवरच येऊन पडते. मुलांच्या आहाराची, व्यायामाची व विश्रांतीची काळजी घेऊन त्या सर्वांना अभ्यासाच्या  संदर्भात समतोल साधणे हे काम कुशल स्त्री सहजपणे करू शकते. आपला मुलगा वा मुलगी योग्य मित्रमैत्रिणींची निवड करतो की नाही हे पाहाणेही महत्त्वाचे ठरते. मैत्री ही नेहमी अभ्यासाला पूर्क कशी ठरेल, चारित्र्य संवर्धनास पोषक कशी ठरेल हे मातांनी अवश्य पाहावे. अभ्यासाला उपयुक्त अशा सवयी मुलास कशा लागतील, वाईट सवयीपासून तो कस दूर राहील याबाबत माता जितक्या दक्ष राहातील तितक्या प्रमाणात मुलाच्या भावी यशाचा पाया घातला जाईल. पालकांनी स्वतःच्या आचरणाने निर्माण केलेला नैतिक धाक हा प्रत्यक्ष शारीरिक शिक्षेपेक्षा मुलांना अधिक चांगले वळन लागतो.

जीवनमुल्यांची शिदोरी
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांची स्वतः विचार करण्याची शक्ती विकसित झालेली असते. चिकित्सक दृष्टीने तो अनेक गोष्टींकडे पाहू लागतो. त्याच्या अभ्यासाची पातळीही उंचावते. अशा वेळी त्याला सर्व अभ्यासविषयक सुविधा निर्माण करून देणे आणि त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीची काळजी घेणे एवढे महत्त्वाचे काम मातांना करता येऊ शकेल. जीवनातील चांगल्या वाइटांची निवड करण्याची दृष्टी विद्यार्थ्याला येथे प्रकर्षाने द्यावी लागते. अभ्यासक्रमाची निवड करतानाही सर्व माहिती मिळवून व्यावहारिक पातळीवरून त्याला मार्गदर्शन करता येईल. अभ्यासाला प्रोत्साहन देणे, अपयशाच्या प्रसंगी धीर देणे, कष्ट सोसण्याची सवय निर्माण करणे, आर्थिक ओढगस्तीतही स्वाभिमानाने जीवन जगण्याची दीक्षा देणे, स्वावलंबनाचे महत्त्व त्याच्या मनावर बिंवविणे इत्यादी सारखी जीवनमूल्ये विद्यार्थ्यांच्या ठायी निर्माण करण्याचे फार मोठे कार्य याच वयात स्त्रिया करू शकतात. अशिक्षित किंवा अपदवीधर स्त्रीच्या ठिकाणीही ही श्रेष्ठ जीवनमूल्ये असू शकतात आणि प्रत्यक्ष जीवनाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या प्रगतीबरोबर आईने दिलेली ही श्रेष्ठ जीवनमूल्यांची शिदोरी फार मोठी मोलाची असते.