मुंबई शहर जिल्हा

गेट वे ऑफ इंडीया

गेट वे ऑफ इंडीया

‘मिरात-ई-अहमदी’ या ग्रंथात आलेल्या ‘मन्‌बाई’ या शब्दाचा आधार घेऊन ‘मुंबाई’ या स्थानिक देवतेवरून ‘मुंबई’ हे नाव पडले असावे, असे मत सालेटोर यांनी मांडले आहे. मुंगा कोळ्याने मुंबादेवीचे मंदिर बांधले आणि मुंबादेवीवरून मुंबाबाई-मुंबाआई-मुंबा-मुंबई असा अपभ्रंश होत जाऊन ‘मुंबई’ हे नाव प्रचलित झाले, असाही एक मतप्रवाह आहे. अ. द. पुसाळकर व वि. गो. दिघे यांसारखे संशोधक मृण्मयी-मुंबई-मुंबई अशीही मुंबई नावाची उपपत्ती लावतात. स्थानिक कोळी जमातीच्या मुंबादेवी या देवतेच्या नावावरून मुंबई हे नाव प्रचलित झाले असावे, हे मत सर्वसामान्यपणे मान्य करण्यात येते.

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीवर दूरगामी परिणाम घडाविणाऱ्या रॉयल एशियाटिक सोसायटी (१८०५), स्टुडन्ट्स लिटररी अ‍ॅंड सायंटिक सोसायटी (१८४८), ज्ञानप्रसारक समा (१८५२), बॉम्बे असोसिएशन (१८५२); सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स (१८५७); प्रार्थना समाज (१८६७); आर्य समाज (१८७५), थिऑसफिकल सोसायटी (१८७५) यांसारख्या संस्था मुंबईतच स्थापन झाल्या. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशनही १८८५ मध्ये मुंबई भरले.

येथीलच गवालिया तँक मैदानावरून (सध्याच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरून) १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले. येथेच जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई नौरोजी, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पाडुरंग, भाऊ दाजी लाड, बाबा पद्मनजी, न्यायमूर्ती महदेव गोविंद रानडे, फिरोजशहा मेहता यांसारख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतालाही ललाभूत ठरलेल्या थोर व्यक्तित्वांचे कार्य-कर्तृत्व फुलले.