ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांचे निधन

संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि गोवामुक्ती संग्रामातील अग्रणी, ज्येष्ठ पत्रकार व शिवसेनेचे माजी खासदार नारायण आठवले ऊर्फ अनिरुद्ध पुनर्वसू यांचे आज सकाळी १० वाजता साहित्य सहवास येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी अनुराधा व कन्या अश्‍लेषा असा परिवार आहे. शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.

साधीसोपी आणि तितकीच आक्रमकशैली हे आठवले यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांनी तीनवेळा कारावास भोगला. गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांनी स्वत:ला झोकून दिले. ‘गोमंतक’ या वृत्तपत्राचे संपादकपदही त्यांनी भूषविले होते. गोव्यात मराठी भाषेवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध संघर्ष करून याविरुद्ध सतत दहा वर्षे त्यांनी खरमरीत लिखाण केले. त्यांची समाजाविषयीची तळमळ पाहून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९६ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली. शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आठवले यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरीत्या राबविले. आठवले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कच्या विद्युतदाहिनीत सायंकाळी ५ वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.