आता पाणी फक्त पिण्यासाठीच

वैतरणा धरण

वैतरणा धरण

मान्सूनचे आगमन वेळेवर होईल, असे सगळे अंदाज मातीस मिळाले आहेत. पावसाने गेल्या तीन आठवड्यापासून सुट्टी घेतली आहे आणि फक्त कोकणामध्येच पाऊस धो-धो कोसळत आहे. राज्याच्या बहुतांश भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्याच्या धरणांमध्ये सध्या फक्त १३ टक्केच पाणी शिल्लक आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश महसूल आणि नगरविकास यंत्रणांना दिले आहे.

शहरी आणि ग्रामीण भागांतील पाणीटंचाईच्या प्रसंगावर मात करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन तातडीने करावे. पिण्याच्या पाणी योजनांना ज्या धरणांतून पाणी दिले जाते अशा धरणांतील पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले.

बुधवारी विधानभवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली व त्यात पाण्याच्या संकटाबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. १२५.५ मिमी पावसाची नोंद २७ जूनपर्यंत झाली असून, तो वार्शिक सरासरीच्या ५३.५० टक्के इतकाच आहे.