न्यायालयाबाहेर निकाल

अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष अब्राहम लिंकन हे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वी वकिली करीत असत.
एकदा एका गृहस्थ त्यांच्याकडे गेला व म्हणाला, ‘वकीलसाहेब, जॉन नावाच्या एका ओळखीच्या गृहस्थाने मजकडून अडीच डॉलर्स एका महिन्यात परत करण्याच्या बोलीने उसने घेतले. तो ते आता परत करीत नाही. मला न्यायालयात त्याच्याविरुध्द दावा करुन, ती रक्कम वसूल करायची आहे.’
बारीकसारीक गोष्टींसाठी न्यायालयात जाणे कसे मूर्खपणाचे ठरते याबद्दल लिंकन यानी त्याला बरचं समजावून सांगितल, पण त्याचं उत्तर एकच ‘मला त्या जॉनक्डून माझी रक्कम काहीही करुन वसूल करुन त्याला जिरवायचं आहे; मग त्यासाठी कितीही खर्च येवो.’

यावर किंचीत विचार करुन लिंकन म्हणाले, ‘ हे पाहा माझी फ़ी १० डॉलर्स आहे. शिवाय ती मी आगाऊ घेतो. आहे कबूल ?”हो घ्या तुमची फ़ी.’ दहा डॉलर्स लिंकन यांच्या हाती देत तो गृहस्थ म्हणाला, व लिंकन यांच्या सांगण्यावरुन तो तिथून निघून गेला.

तो निघून गेल्यावर लिंकननी त्यातले पाच डॉलर्स आपल्या घरी ठेवले आणि उरलेले पाच डॉलर्ससह ते जॉनकडे जाऊन म्हणाले, ‘हे पाहा जॉन, पॉलकडून अडीच डॉलर्स उसने घेतले असून, त्याबद्दलची लेखी पोचही तू त्याला दिली आहेस. तेव्हा आता त्या रकमेच्या वसुलीसाठी त्याने न्यायालयात तुझ्याविरुध्द दावा करायचा, मग तो दावा दिवसानुदिवस चालत राहून तू व त्याने तिकडे खेटे घालायचे हे योग्य आहे का ?’

जॉन म्हणाला, ‘लिंकनसाहेब, तुमचं म्हणणं खरं आहे, पण सध्या पॉलला एक रकमी अडीच डॉलर्स देण्याच्या मी परिस्थितीत नाही.’यावर त्याच्या हाती पाच डॉलर्स ठेवीत लिंकन म्हणाले, ‘अरे जॉन तुला तुझ्या पदरचे अडीच डॉलर्स पॉलला द्यायला मी कुठे सांगतोय ? या डॉलर्स मधील अडीच डॉलर्स तू पॉलला दे, त्याच्याकडे असलेली ती तू दिलेली लेखी पोच तू परत घे आणि हे करण्याचा मेहनताना म्हणून या पाच डॉलर्समधले अडीच डॉलर्स तु तुला घे. मग तर काही हरकत नाही ना ?’

जॉन या गोष्टीला ताबडतोड तयार झाला व त्याने लिंकन यांच्या सल्ल्याप्रमाणे केले.य़ांमुळे झाले काय ? लिंकन यांच्यासारखा जबरदस्त वकील आपण केल्यामुळे घाबरून जाऊन जॉनने आपले पैसे परत केले, अशा गैरसमजूतीमुळे पॉल खूश झाला. उसनी घेतलेली रक्कम प्रत्यक्ष आपल्या खिशातून द्यावी न लागता, उलट तेवढीच रक्कम फ़ुकटात आपल्या पदरी पडली म्हणून जॉन संतुष्ट झाला, आणि न्यायालयात दावा न लढवता फ़ी मात्र पदरात पडली, म्हणून लिंकन यांना आनंद झाला !