ओल्या खोबर्‍याची चटणी

साहित्य :

  • १ वाटी ओले खोबर
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • ३ चमचे तेल
  • अर्धा चमचा मोहरी
  • पाव चमचा जिरे (घातले नाही तरी चालते)
  • एक अष्टमांश चमचा हिंग
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा मीठ
  • अर्धा चमचा साखर

कृती :

मिरच्यांचे लहान तुकडे करावे. तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर मिरच्या घालाव्या. आंच कमी करून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनंतर झाकण काढून मिरच्या परताव्या (झाकण ठेवले म्हणजे मिरचीचा खकाणा घरभर उडत नाही.) मिरच्या चुरचुरीत झाल्या की त्यावर खोबरे घालावे. मीठ व साखर घालून दोन मिनिटे ढवळावे.
सर्व नीट मिसळून आंच मंद ठेवावी. खोबरे कोरडे दिसू लागले की चटणी खाली उतरवावी. गार झाल्यानंतर काचेच्या भांड्यात किंवा स्टीलच्या डब्यात ठेवावी. फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर टिकते.

ही चटणी वाटायची नाही. त्यामुळे काम सोपे होते. तसेच त्यात आंबट पदार्थ नसल्यामुळे संतोषी शुक्रवारचा उपवास असल्यास त्याला उपयोगी पडते.

सणसणीत चटणी हवी असल्यास मिरच्याचे प्रमाण वाढावावे व त्या बेताने मीठही थोडे जास्त घालावे.