ऑनलाईन फॉर्म भरण्याचा स्वागतार्ह निर्णय

येत्या शैक्षणिक वर्षापासून पुणे विद्यापीठातील सर्व पदवी-पदव्युत्तर कोर्सेसचे परीक्षांचे फॉर्म विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन स्वरुपातच भरुण घेण्याचा स्वागतार्ह निर्णय परिक्षा विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्याने पदवीच्या पहिल्या वर्षासठी फॉर्मवर भरलेली माहिती विद्यापीठाच्या सर्व्हरवर जमा होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे कष्ट कमी होणार आहेत कारण परीक्षेला लागणारी ठराविक माहिती त्यांना पुन्हा भरण्याची गरज पडणार नाही. यामुळे निकाल-हॉलतिकिटावरील नावांच्या व विषयांच्या निवडीत होणार्‍या चुकाही कमी होतील.

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांनी माहिती दिली की, ऑनलाईन स्वरुपात फॉम भरून घेतल्याने विद्यापीठ कर्मचार्‍यांचे मोठे काम कमी होणार आहे. विद्यार्थ्यांनी हाताने फॉर्म भरुन कॉलेजकडे जमा केल्यानंतर विद्यापीठाला या सर्व फॉर्मची पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागते. पण आता ऑलाईन फॉर्म भरुन घेतल्याने वेळेची बचत होईल व याचा उपयोग परीक्षांचे नियोजन आणि निकाल वेळेत लावण्यासाठी करण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर एमए-एमकॉम परिक्षांचे फॉर्म ऑनलाईन घेण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चुकांचे प्रमाण दहा टक्के सुद्धा नव्हते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्वच कोर्सचे फॉर्म येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन स्वरुपात भरुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पण यामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्या म्हणाल्या, ‘ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रश्न जरी असला तरी संबंधित कॉलेजांनी दुर्गम भागात जेथे कम्प्युटर व इंटरनेट नसेल, तेथे विद्यार्थ्यांची सोय करणे अपेक्षित आहे.’