पैशाने गेला. पण बुद्धीने आला

फ़ॅकॉईस हा फ़्रेंच लेखक पॅरीसमधल्या आपल्या घरुन निघून, फ़्रान्समधील प्रेक्षणीय स्थळांचा प्रवास करीत होता.खर्चिक वृत्तीमुळे प्रवासात असतानाच त्याच्याजवळचे पैसे संपले. वाटेत लागलेल्या गावातील ज्या एका चांगल्या हॉटेलमध्ये तो उतरला होता, त्या हॉटेलचे बील चुकते करायलासुध्दा त्याच्यापाशी पैसे उरले नव्हते. समजा, पुढला प्रवास जरी रद्द केला, तरी हॉटेलचे बिल व घरी परतण्यासाठीचा प्रवास खर्च, याकरिता पैसे कुठून आणायचे ? असा बिकट प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा राहिला.

अखेर एका सकाळी त्याने हॉटेलातील आपल्या खोलीतील टॆबलावर पांढऱ्या कागदात कसली तरी पुड घालून तयार केलेल्या तीन छोट्या व लांबट आकाराच्या पुड्या रांगेने ठेवून दिल्या. त्यातील प्रत्येक पुडीवर त्याने काहीतरी लिहिले व नाष्टा करुन सकाळीच तो त्या गावातील प्रेक्षणीय स्थळे पाहायला बाहेर पडला.

फ़ॅकॉईस बाहेर पडल्यावर हॉटेलातील नोकर जेव्हा त्यांची खोली झाडायला गेला, तेव्हा टेबलावर रांगेत ठेवलेल्या त्या तीन पुड्या त्याच्या दृष्टीस पडल्या. उत्कंठेपोटी त्याने टेबलाजवळ जाऊन त्या पुड्यांवरील मजकूर वाचायला सुरुवात केली, तर काय भलतेच ! एका पुडीवर लिहिले होते, ‘फ़्रान्सच्या सम्राटासाठी जालीम विष !’ दुसऱ्या पुडीवर लिहिले होते, ‘फ़्रान्सच्या पंतप्रधानासाठी जहरी विष!’ तर तिसऱ्या पुडीवरच्या मजकुरावरुन ते भयंकर विष फ़्रान्सच्या सरसेनापतीसाठी असल्याचे त्या सेवकाला कळून चुकले.

तो मजकूर वाचून घामानं डबडबून गेलेला तो सेवक लटपट कापत त्या हॉटॆलच्या मालकाकडे गेला व त्याने आपल्या हॉटॆलात उतरलेला मनुष्य किती भयंकर स्वरुपाचा आहे याची त्याला कल्पना दिली.
मालकाने स्वत: त्या पुड्यांवरील मजकूर वाचला आणि तोही हादरुन गेला. तो पक्का राजनिष्ठ होता. त्यानी ही गोष्ट गावातल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कानी घातली. चार-पाच पोलीस अधिकारी गूपचूप त्या हॉटेलात आले व आडबाजूला दडून राहिले.

तीन-चार तासानंतर जेव्हा फ़ॅकॉईस आपल्या खोलीवर परतला, तेव्हा दडून राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या खोलीवर छापा घालून त्याला पकडले, त्या तीन पुड्या ताब्यात घेतल्या आणि त्याला एका खास वाहनात घालून ते पॅरिसला घेऊन गेले.

पॅरिसला जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी त्या तीन पुड्या उघडल्या, तेव्हा त्यांना त्या तीनही पुड्यात साधी माती असल्याचे आढळून आले.

‘तू असे का केलेस?’ असे विचारताच फ़ॅकॉईस पोलीस अधिकाऱ्यांना म्हणाला, परत यायला माझ्याजवळ एक पैसाही शिल्लक नव्हता, तर सरकारी इतमामाने फ़ुकट येण्यासाठी, अशी युक्ती योजण्याखेरीज मजपाशी दुसरा मार्ग कुठे होता ?’