पालक भात

साहित्य :

 • दीड वाटी तांदूळ
 • ३ वाट्या बारीक चिरलेला पालक
 • अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे
 • २ लाल मिरच्या
 • मीठ
 • ४ वाट्या पाणी
 • १ चमचा धने-जिरेपूड
 • ३ चमचे तेल
 • पाव चमचा मोहरी
 • पाव चमचा जिरे
 • पाव चमचा हिंग
 • २ हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी ओले खोबरे
 • २ चमचे टोमॅटो सॉस ( ऐच्छिक)

कृती :

पालक भात

पालक भात

हिरव्या मिरच्या उभ्या चिराव्या, तांदूळ धुवून ठेवावे. पालक पाण्यात ठेवावा. त्यात अर्धा चमचा हळद घालावी. पंधरावीस मिनिटांनी पालक चाळणीवर हाताने काढून ठेवावा म्हणजे माती, कचरा, पाण्यात खाली बसलेला दिसेल.

नंतर चाळणीतला पालक नळाखाली धरून खळखळून धुवावा. हाताने अलगद पाणी जमेल तितके पिळून काढावे. पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग व लाल मिरच्या फोडणीस टाकून त्यावर पाणी फोडणीस टाकावे.

त्यात मीठ, धनेजिरेपूड, उभ्या चिरलेल्या मिरच्या, शेंगदाणे घालावे. उकळी आली म्हणजे तांदूळ व पालक घालावे. उकळी फुटली की दोन मिनिटे ठेवून नंतर पातेले गरम कुकरमध्ये ठेवावे. झाकण ठेवून भात अर्धा तास शिजवावा. कुकर उघडला की हाताने शीत दाबून पहावे. मऊसर वाटल्यास चमचाभर तूप कडेने सोडावे.

वाढतेवेळी ओले खोबरे वरून शिवरावे व टोमॅटो सॉसचे ठिपक द्यावेत. हा भात चवीला अगदी सौम्य आहे. त्यामुळे मसालेदार भाजी आमटीबरोबर छान लागतो.